

Asia Cup Trophy Controversy :
आशिया चषक स्पर्धेच्या (Ind vs Pak Asia Cup Final) अंतिम सामन्यात भारतीय संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव करत विजय मिळवला. मात्र या सामन्यानंतर दुबईतील मैदानात ट्रॉफी स्वीकारण्यावरून मोठा वाद निर्माण झाला. भारतानं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी आणि मेडल स्विकारण्यास नकार दिल्यानंतर नक्वी हे ट्रॉफी घेऊन हॉटेलमध्ये गेल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, टीम इंडिया ट्रॉफीविनाच भारतात परतली आहे.
या वादावर प्रतिक्रिया देताना, बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी भारतीय संघाच्या भूमिकेचे समर्थन केले. "आपल्या देशाविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीकडून ट्रॉफी स्वीकारता येणार नाही," असे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंनी तिन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणं आणि फायनलच्या नाणेफेकीआधी फोटो शूटला जाणंही टाळले होते.
संपूर्ण जगासमोर मोहसीन नक्वी यांचा अपमान झाल्यानंतर, पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वी यांनी अखेर आशिया चषक ट्रॉफी भारताला सादर करण्यास सहमती दर्शविली. मात्र, त्यासाठी त्यांनी एक अट ठेवली.
ट्रॉफी सादरीकरणासाठी पुन्हा एक समारंभ आयोजित करा, अशी अट नक्वी यांनी ठेवली आहे. मात्र, असा समारंभ होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आगामी काही दिवस ट्रॉफीवरून वाद कायम राहण्याची शक्यता दिसून येत आहे.
कर्णधाराने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार देणे हे आयसीसीच्या आचारसंहितेअंतर्गत येऊ शकते, परंतु याबाबत कोणताही विशिष्ट नियम नाही. मात्र, हे कृत्य क्रिकेटच्या भावनेविरुद्ध मानले जाते. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला ट्रॉफी न स्वीकारण्याबद्दल स्पष्टीकरण द्यावे लागेल आणि त्यानंतर स्पर्धा संस्था (ACC) किंवा ICC याबाबत निर्णय घेऊ शकते. या घटनेप्रकरणी नियमांचे उल्लंघन झाले आहे का, आणि तसे असल्यास कोणते दंड आकारले जाऊ शकतात, याबद्दल आयसीसीकडून तपास केला जाण्याची शक्यता आहे.