

India Vs West Indies 1st Test :
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आजपासून (२ ऑक्टोबर) अहमदाबाद इथं सुरू झाला. वेस्ट इंडीजनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांनी आपल्या पायावर धोंडा मारून घेतला की काय अशी स्थिती लंचपर्यंत निर्माण झाली आहे.
भारतीय संघानं वेस्ट इंडीजचा निम्मा संघ अवघ्या ९० धावात पॅव्हेलियनमध्ये धाडला आहे. भारताकडून मोहम्मद सिराजनं ३ तर बुमराह आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली आहे. जरी भारत वेस्ट इंडीज सारख्या तुलनेनं दुबळ्या संघासोबत खेळत असला तरी ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी अत्यंत महत्वाची आहे.
पहिल्या डावात विंडीज थोडा प्रतिकार करेल असं वाटत होतं. मात्र अवघ्या १२ धावांवर असताना मोहम्मद सिराजनं तेजनारायण चंद्रपॉलला भोपळाही न फोडता पॅव्हेलियनमध्ये परत पाठवलं. त्यानंतर जसप्रीत बुमराहनं देखील आपल्या विकेट्सचं खातं उघडत जॉन कॅम्पबेलला ८ धावांवर बाद केलं. दोन धक्के बसल्यावर किंग आणि अथानाजे डाव सावरतील असं वाटलं होतं. मात्र सिराजनं त्यांची डाळ शिजू दिली नाही. या दोघांनाही सिराजनं तंबूचा रस्ता दाखवत विंडीजची अवस्था ४ बाद ४२ धावा असी केली होती.
दरम्यान, लंच टाईम जवळ येत होता. अन् विंडीजचा शाई होप डाव सावरण्याच्या प्रयत्नात होता. मात्र कुलदीप यादवनं त्याला बाद करत विंडीजला पाचवा धक्का दिला. लंचपर्यंत विंडीजची अवस्था ५ बाद ९० धावा अशी झाली.
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल, ध्रुव जुरेल, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नीतीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
तेजनारायण चंद्रपॉल, जॉन कॅम्पबेल, एलिक इथानाज, ब्रँडन किंग, शाय होप, रोस्टन चेज, जस्टिन ग्रीव्स, जोमेल वॉरिकन, खॅरी पियरे, जोहान लेन, जेडन सील्स