पुढारी ऑनलाईन: दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यांच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे. भारताविरुद्धच्या सेंच्युरियन कसोटीत डी कॉक दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा भाग होता. या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने 34 तर दुसऱ्या डावात 21 धावा केल्या.
डी कॉक दक्षिण आफ्रिकेसाठी एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेट खेळत राहणार आहे. त्याने 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. या फॉरमॅटमध्ये तो दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधारही राहिला आहे. मात्र, संघाच्या खराब कामगिरीनंतर त्याने कर्णधारपद सोडले.
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, "यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने त्याच्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्याच्या उद्देशाने तत्काळ प्रभावाने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे."
डेकॉकने दक्षिण आफ्रिकेसाठी एकूण ५४ कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 38.82 च्या सरासरीने 3300 धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये डी कॉकच्या बॅटने एकूण सहा शतके आणि 22 अर्धशतके झळकावली आहेत. त्याचवेळी त्याची सर्वोच्च धावसंख्या १४१ धावांची होती.
https://youtu.be/Qjmx0ZJ6Xx4