गकेबेहरा, वृत्तसंस्था : पावसाने बाधित झालेल्या दुसर्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतावर (IND vs SA) 5 विकेटस्नी विजय मिळवला. रिंकू सिंग (नाबाद 68) आणि सूर्यकुमार यादव (56) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने 19.3 षटकांत 7 बाद 180 धावा केल्या; मात्र डावातील शेवटचे तीन चेंडू शिल्लक असताना पावसाने हजेरी लावली. त्यामुळे भारताचा डाव पूर्ण होऊ शकला नाही. पाऊस थांबल्यानंतर दक्षिण आफ्रिकेसमोर डकवर्थ-लुईस नियमानुसार 15 षटकांत 152 धावांचे आव्हान ठेवण्यात आले. हे आव्हान यजमान संघाने 5 विकेटस् आणि 7 चेंडू शिल्लक ठेवून पूर्ण केले.
15 षटकांत 152 धावांचे लक्ष्य डोळ्यांपुढे ठेवून दक्षिण आफ्रिकेच्या रिझा हेंड्रिक्स आणि मॅथ्यू ब्रीड्झकी यांनी धडाकेबाज सुरुवात करत 2.5 षटकांतच 41 धावा कुटल्या; मात्र जडेजा आणि तिलक वर्मा यांनी मिळून 7 चेंडूंत 16 धावा ठोकणार्या मॅथ्यूला धावबाद केले. यानंतर रिझा हेंड्रिक्स आणि एडन मार्कराम यांनी भारतीय गोलंदाजीवर हल्ला चढवला. दोघांनी 30 चेंडूंत जलद 54 धावा जोडल्या; पण 30 धावांवर मार्कराम बाद झाला. पुढच्या षटकात अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना रिझा हेंड्रिक्सही (49) बाद झाला. हे दोघे पाठोपाठ बाद झाले असले, तरी त्यांनी विजयाची पायाभरणी केली होती. यानंतर डेव्हिड मिलर (17), त्रिस्टन स्टब (14) आणि अँडी फेहलुक्वायो (10) यांनी विजयाचे लक्ष्य आरामात गाठून संघाला मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणार्या दक्षिण आफ्रिकेने भारताचे दोन्ही सलामीवीर 6 धावांत गार केले. शुभमन गिल व यशस्वी जैस्वाल हे दोघे शून्यावर माघारी परतले; मात्र त्यानंतर आलेल्या तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी दमदार फलंदाजी करत 49 धावांची भागीदारी रचली. त्यांनी पॉवर प्लेमध्येच 55 धावांपर्यंत मजल मारून दिली. (IND vs SA)
तिलक वर्मा 29 धावा करून बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने अर्धशतकी खेळी करत रिंकू सिंगसोबत चौथ्या विकेटसाठी 70 धावा जोडल्या; मात्र सूर्या 56 धावा करून बाद झाला. त्यानंतर रिंकूने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत भारताकडून आपले पहिले वहिले टी-20 अर्धशतक ठोकले. त्याने 39 चेंडूंत नाबाद 68 धावा करत भारताला 19.3 षटकांत 180 धावांपर्यंत पोहोचवले. भारताच्या डावातील तीन चेंडू शिल्लक असतानाच पाऊस आल्याने बराच वेळ वाया गेला. त्यानंतर पाऊस थांबला अन् दक्षिण आफ्रिकेसमोर डकवर्थ-लुईस नियमानुसार 15 षटकांत 152 धावांचे आव्हान ठेवण्यात आले.
हेही वाचा…