नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीत कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या १०, जनपथ निवासस्थानी आज (दि.१२) मंगळवारी विरोधी पक्षांच्या नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. समान राजकीय विचारधारा असलेल्या राजकीय पक्षातील प्रमुख नेते बैठकीत उपस्थित होते. (Sonia Gandhi meets Pawar)
विद्यमान राजकीय स्थितीसह खासदारांच्या निलंबनामुळे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात निर्माण झालेली कोंडी फोडण्याच्या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाल्याचे कळतेय. बैठकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत, नॅशनल कॉन्फरेन्सचे फारूक अब्दुल्ला, डीएमके खासदार टीआर बालू, मल्लिकार्जुन खरगे, के.सी.वेणुगोपाल, राहुल गांधी प्रामुख्याने उपस्थित होते.
राज्यसभेचे सभापती व्यैंकय्या नायडू यांच्यासोबत भेट घेवून विरोधी खासदारांच्या निलंबनामुळे निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी शरद पवार मार्ग काढण्यासाठी चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विरोधकांच्या बैठकीत बैठकीत तृणमूल कॉंग्रेसला बोलावण्यात आले नसल्याची माहिती समोर आली आहे.
खासदारांचे निलंबनामुळे ससंदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकार आणि विरोधकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशात दोन्ही सदनाच्या कामकाजात बाधित झाले आहे, हे विशेष. बैठकीसाठी सोनिया गांधी यांच्याकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांना आमंत्रित करण्यात आले होते. पंरतु, या नेत्यांकडून संजय राउत तसेच टीआर बालू यांना बैठकीसाठी पाठवण्यात आले आहे.
विरोधकांच्या एकजुटीसंबंधीची बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीत संसदेतील कार्यवाही संबंधी चर्चा करण्यात आली. विरोधक माफी मागणार नाही, असे बैठकीनंतर शिवसेना नेते संजय राउत म्हणाले. राज्यात सोबत मिळून काम करण्यात येईल, असे राउत यांनी यावेळी स्पष्ट केले. तर, बैठकीत विरोधकांच्या एकतेसंबंधी चर्चा करण्यात आली.
देशातील समस्यांवर चर्चा करण्यात आली. यूपीए अधिक बळकट होणार. कशाप्रकारे एकत्रित काम करता येईल? कशाप्रकारे या देशाला अडचणीतून बाहेर काढता येईल, यासंबंधी चर्चा करण्यात आल्याचे फारूक अब्दुल्ला म्हणाले. तर, बैठकीत विरोधकांच्या एकते संबंधी चर्चा झाल्याचे टीआर बालू म्हणाले.
विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून विरोधकांची मोट बांधण्यात तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी पुढाकार घेतला आहे. विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांसोबत त्या भेटी घेत आहेत.
पंरतू, काँग्रेस वगळता विरोधकांची नवीन आघाडी उभी करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना शिवसेना, राष्ट्रवादी कडून म्हणावा तेवढा प्रतिसाद दिला जात नसल्याचे दिसून आले आहे.
अशात सोनिया गांधी यांनी विरोधकांची बैठक घेवून विरोधकांच्या आघाडीला कॉंग्रेसशिवाय पर्याय नसल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.