Nay Varanbhat Loncha Kon Nay Koncha movie 
मनोरंजन

‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ शुक्रवारी होणार प्रदर्शित

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

समाजातील वास्तववादी घटनांचे दर्शन घडवण्यात अग्रेसर चित्रपट 'नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा' शुक्रवारी चित्रपटगृहांत भेटीला येतोय. निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर पुन्हा एकदा आपल्या या आगामी चित्रपटाद्वारे सत्य परिस्थिती मांडण्यासाठी सज्ज झाले आहेत. आज चहूबाजूला मांजरेकरांच्या 'नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा' या आगामी मराठी चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे. शीर्षकापासून लुकपर्यंत सर्वच बाबतीत मराठीपासून हिंदी सिनेसृष्टीपर्यंत सर्वच ठिकाणी हा चित्रपट चर्चेत आहे.

उत्सुकता वाढवणाऱ्या टायटलला कुतूहल जागवणाऱ्या मोशन पोस्टरची जोड दिल्यानंतर आता चित्रपटाचं नवं पोस्टर आणि धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. यात वास्तववादी चेहऱ्यांचं दर्शन घडत आहे. पुढील शुक्रवारी १४ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

नुकतंच रिलीज करण्यात आलेलं या चित्रपटाचं नवं पोस्टर चित्रपटातील विविध व्यक्तिरेखांचं दर्शन घडवणारं आहे. हे पोस्टर चित्रपटातील काळ आणि वातावरणाची झलक दाखवणारं आहे. 'काँक्रिटच्या जंगलातील उद्ध्वस्त अस्तित्व' ही पोस्टरवरील टॅगलाईन दाहकतेची जाणीव करून देणारी आहे.

विविध वयोगटातील चेहरे चित्रपटाच्या पोस्टरवर पाहायला मिळतात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील भाव त्यांच्या मनातील वेदना आणि विचार सांगण्यासाठी पुरेसे आहेत. या चित्रपटातील काळ जवळपास तीन दशकांपूर्वीचा आहे. त्या काळी झालेल्या गिरणी कामगारांच्या संपाचा, संपकरी आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीवनावर झालेला भीषण परिणाम, त्यांची विदारक परिस्थिती, त्यांनी सहन केलेल्या वेदना, संपामुळं पूर्णत: वाताहत झालेली पिढी आणि त्याचे समाजात उमटलेले पडसाद पहायला मिळणार आहेत.

पोस्टरवर दिसणारे सर्व चेहरे त्या भीषण परिस्थितीचं वास्तव दाखवणारे आहेतच. पण त्यासोबतच तीन पिढ्यांचं प्रतिनिधीत्वही करणारे आहेत. 'अठरा वर्षांवरील प्रेक्षकहो, दम असेल तरच थेटरात येऊन बघायचं…' ही पोस्टरवरील ओळही लक्ष वेधून घेते.

प्रेम धर्माधिकारी, वरद नागवेकर, छाया कदम, शशांक शेंडे, रोहित हळदीकर, कश्मिरा शाह, उमेश जगताप, गणेश यादव, अतुल काळे, अश्विनी कुलकर्णी, सविता मालपेकर, ईशा दिवेकर आदी कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत.

गिरणी कामगारांच्या संपानंतर जगण्यासाठीची धडपड, हार न मानण्याचा मराठी बाणा, त्या वेळेचं ज्वलंत चित्र आणि ज्येष्ठ लेखक जयंत पवार यांच्या धारदार लेखनशैलीद्वारे कथेमध्ये निर्माण झाला. हृदयभेदी नाट्यानं मांजरेकरांना आकर्षित केलं होतं. त्यातून या चित्रपटाची निर्मिती झाली. हा चित्रपट १४ जानेवारीला राज्यभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचलं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT