Yere Yere Paisa 3 movie song launched
मुंबई - ‘येरे येरे पैसा’ आणि ‘येरे येरे पैसा २’ या यशस्वी चित्रपटांनंतर आता प्रेक्षकांच्या मनोरंजनाची ट्रिपल डोस घेऊन ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे टायटल साँग नुकतेच एका सोहळ्यात लाँच करण्यात आले. विशेष म्हणजे या सोहळ्याला बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान आणि महेश मांजरेकर याची विशेष उपस्थिती होती. या वेळी सलमान खान याने गाण्याचे कौतुक करत चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.
या गाण्याला वैशाली सामंत आणि आदर्श शिंदे यांनी आवाज दिला आहे. अमितराज यांचे संगीत आहे. या चित्रपटातील इतर गाण्यांना पंकज पडघन यांचे संगीत लाभले आहे. हे गाणे सचिन पाठक (यो) यांनी लिहिले आहे.
सलमान खान म्हणाला, ‘’ हे गाणे अप्रतिम झाले आहे. गाण्यावरूनच चित्रपट काय जबरदस्त असेल याचा अंदाज येतोय. चित्रपटाची संपूर्ण टीम जबरदस्त आहे. या सगळ्यांना माझ्याकडून खूप शुभेच्छा आणि या चित्रपटाच्या चौथ्या भागात मला सहभागी व्हायला नक्कीच आवडेल.’’
दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले, “येरे येरे पैसा ३' ही केवळ फ्रँचाईजी नाही, तर प्रेक्षकांशी आमचा भावनिक संबंध आहे. या भागात अधिक मोठं, धडाकेबाज आणि थरारक काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आहे.”
निर्माते अमेय विनोद खोपकर आणि निनाद बत्तीन म्हणाले, “सलमान खानने वेळात वेळ काढून आमच्यासाठी या सोहळ्याला उपस्थित राहाणं, ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. या टायटल साँगच्या माध्यमातून चित्रपटाची धमाल झलक प्रेक्षकांसमोर आली आहे, आता चित्रपटगृहात पूर्ण धमाका अनुभवायला मिळेल.”
धर्मा प्रॉडक्शन्स प्रस्तुत अमेय विनोद खोपकर पिक्चर्स, उदाहरणार्थ निर्मित, न्युक्लिअर ॲरो पिक्चर्स निर्मित या चित्रपटाची सहनिर्मिती वर्डविझार्ड एंटरटेनमेंटने केली आहे. सुधीर कोलते, ओमप्रकाश भट्ट, नासीर शरीफ, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, निनाद नंदकुमार बत्तीन, गिरीधर गोपाळकृष्ण धुमाळ हे चित्रपटाचे निर्माते असून सौरभ लालवाणी सहनिर्माते आहेत. कलाकारांच्या यादीत संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर यांच्यासह आणखी काही चर्चित चेहरे दिसणार आहेत.