

Shubh vivah Chinmay Udgirkar new role in tv serial
मुंबई - स्टार प्रवाहची शुभविवाह मालिका सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर पोहोचली आहे. आकाशच्या जीवघेण्या अपघातानंतर त्याचा जीव वाचवण्यासाठी भूमी शर्थीचे प्रयत्न करणार आहे. आकाशच्या उपचारांसाठी भारतातला नंबर वन न्युरो सर्जन संकर्षण अधिकारी देखील येणार आहेत. डॉ. संकर्षण अधिकारी अत्यंत हुशार डॉक्टर असून आपल्या डॉक्टरी प्रोफेशनकडे प्रोफेशन म्हणून न बघता सेवा म्हणून बघतात. रुग्णांची सेवा हेच त्यांच्या आयुष्यातले पहिले प्राधान्य आहे. प्रसिद्ध अभिनेता चिन्मय उद्रिरकर डॉ. संकर्षण अधिकारीची भूमिका साकारणार आहे.
स्वप्नांच्या पलिकडले मालिकेमुळे चिन्मय घराघरात पोहोचला. जवळपास ११ वर्षांनंतर चिन्मय स्टार प्रवाहच्या मालिकेतून भेटीला येणार आहे. या भूमिकेविषयी सांगताना चिन्मय म्हणाला, ''या भूमिकेसाठी जेव्हा विचारणा झाली तेव्हा ऐकताक्षणीच ती मला आवडली आणि मी लगेच होकार दिला. अशा पद्धतीची भूमिका मी पहिल्यांदा साकारतोय. डॉ. संकर्षण हा स्वभावाने गंभीर आणि कमी व्यक्त होणारा आहे. अत्यंत शिस्तबद्ध आयुष्य जगणारा. आपण भलं आणि आपलं काम भलं या मताचा.''
''आपल्या कुटुंबावर, बायको मुलांवर प्रचंड प्रेम करणारा. पण त्याच्या या मताला, त्याच्या स्वभावाला आणि व्यक्तिमत्वाला तेव्हा धक्का बसतो जेव्हा त्याच्या बायकोचा अपघाती मृत्यू होतो. बायकोच्या अपघाती मृत्यूमुळे तो कोलमडून गेला आहे. त्याचं आयुष्य बायकोपासून सुरु होऊन बायकोपाशी संपायचं. ती गेल्यामुळे तो आतून पुरत तुटलाय. त्याने जगणं सोडून दिलंय. येईल तो दिवस फक्त ढकलतो आहे.''
आकाशवर उपचार करण्यासाठी त्याने भूमीसमोर एक अट ठेवली आहे. ही अट नेमकी काय आहे. आकाशचा जीव वाचवण्यासाठी भूमी ही अट स्वीकारणार का?' हे पाहणं उत्सुकतेचं असेल. शुभविवाह दुपारी २ वाजता स्टार प्रवाहवर पाहा.
video-star pravah insta वरून साभार