Toxic Box Office Collection Pudhari
मनोरंजन

Toxic Box Office Collection: यशच्या ‘टॉक्सिक’ला मोठा धक्का! चौथ्या दिवशी कमाई कोसळली, बजेट वसूल करणं झालं अवघड?

Toxic Box Office Day 4 Collection: यशच्या ‘टॉक्सिक’ चित्रपटाच्या चौथ्या दिवशी म्हणजेच शनिवारी कमाईत सुमारे 9.9 टक्क्यांची घसरण झाली असून, चित्रपटाने भारतात 24.50 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.

Rahul Shelke

Toxic Box Office Day 4 Collection: यशचा बहुप्रतीक्षित कमबॅक असलेला ‘टॉक्सिक’ चित्रपट थिएटरमध्ये दाखल होऊन चार दिवस पूर्ण झाले आहेत. सुरुवातीला चित्रपटाने चांगली सुरुवात केली होती. त्यामुळे वीकेंडला कमाईत मोठी वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, शनिवारी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये अपेक्षेप्रमाणे वाढ झाली नाही. उलट चौथ्या दिवशी कमाईत मोठी घसरण पाहायला मिळाली आहे.

बॉक्स ऑफिसच्या आकडेवारीनुसार, ‘टॉक्सिक’ने शनिवारी भारतात 24.50 कोटी रुपयांची कमाई केली. या दिवशी चित्रपटाचे तब्बल 17,612 शो बुक झाले होते. यासोबतच भारतातील चित्रपटाचे ग्रॉस कलेक्शन 227.50 कोटी रुपये, तर नेट कलेक्शन 190.45 कोटी रुपये झाले आहे.

वर्ल्डवाइड कलेक्शन 254 कोटींच्या पुढे

‘टॉक्सिक’च्या परदेशातील कमाईवर नजर टाकली तर शनिवारी चित्रपटाने सुमारे 4 कोटी रुपये कमावले. त्यामुळे ओव्हरसीज मार्केटमधील चित्रपटाची एकूण कमाई 27.25 कोटी रुपये झाली आहे. भारत आणि परदेशातील कमाई मिळून ‘टॉक्सिक’ने आतापर्यंत 254.75 कोटी रुपयांचा वर्ल्डवाइड व्यवसाय केला आहे.

चौथ्या दिवशी कमाईत 9.9 टक्क्यांची घसरण

शनिवारी ‘टॉक्सिक’च्या कमाईत मागील दिवसाच्या तुलनेत सुमारे 9.9 टक्क्यांची घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसते. चित्रपटाची भारतातील ऑक्युपन्सी 24.3 टक्के इतकी होती.

भाषानुसार कमाई पाहिल्यास, ‘टॉक्सिक’ने हिंदीतून 15.50 कोटी रुपये, कन्नडमधून 6.60 कोटी रुपये, तेलुगूमधून 1.50 कोटी रुपये, तमिळमधून 75 लाख रुपये, तर मल्याळममधून 15 लाख रुपयांची कमाई केली आहे.

500-600 कोटींचे बजेट

‘टॉक्सिक’चे अंदाजे बजेट 500 ते 600 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सध्याची बॉक्स ऑफिस कमाई पाहता चित्रपटासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. वर्ल्डवाइड 254.75 कोटी रुपयांची कमाई झाली असली तरी चित्रपटाला बजेटच्या आसपास पोहोचण्यासाठी अजून मोठा पल्ला गाठायचा आहे.

विशेष म्हणजे वीकेंडमधील उर्वरित दिवस चित्रपटासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. विशेषतः रविवारी कमाईत मोठी वाढ झाली, तर ‘टॉक्सिक’ला बॉक्स ऑफिसवर परिस्थिती सुधारण्याची संधी मिळू शकते. मात्र, वीकेंडनंतरच्या दिवसांतही कमाईचा वेग कायम ठेवणे चित्रपटासाठी मोठे आव्हान असेल.

यश आणि KVN प्रोडक्शन्सची मोठी गुंतवणूक

‘टॉक्सिक’मध्ये यश मुख्य भूमिकेत असून, या चित्रपटातून तो मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे. चित्रपटात मोठी गुंतवणूक करण्यात आल्याने त्याच्या बॉक्स ऑफिस कामगिरीकडे निर्माते आणि चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

आता रविवारी ‘टॉक्सिक’ किती कमाई करतो आणि त्यानंतर वीकडेजमध्ये चित्रपटाचा वेग किती राहतो, यावर त्याच्या बॉक्स ऑफिसच्या भवितव्याचे चित्र बऱ्याच अंशी स्पष्ट होणार आहे. 500 कोटींचा टप्पा गाठण्यासाठी ‘टॉक्सिक’ला आता दमदार कमाईची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT