नेहमी शांत आणि संयमी दिसणारा प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात तो एका मिमिक्री आर्टिस्टवर संताप व्यक्त करताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सुनील आण्णाला त्याची केलेली नक्कल अजिबात आवडली नसल्याचे स्पष्ट होत आहे. यावेळी त्याने मंचावरच त्या मिमिक्री आर्टिस्टला सर्वांसमोर फटकारले.
रेडिटवर प्रसारित झालेला हा व्हिडिओ भोपाळ येथील एका कार्यक्रमातील असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओमध्ये, सुनील शेट्टीने एका कलाकाराला त्याच्या निकृष्ट नक्कलेबद्दल नाराजी व्यक्त करत खडे बोल सुनावले.
सुनील आण्णा म्हणाला, ‘हा महाशय असे संवाद बोलत आहेत, जे माझ्या आवाजात मुळीच नाहीत. इतकी निकृष्ट दर्जाची नक्कल मी आजपर्यंत कधीही पाहिली नाही.’ तो पुढे म्हणाला, ‘जेव्हा सुनील शेट्टी बोलतो, तेव्हा त्याची संवादफेक ही मर्दाला साजेशी असते. पण हा मिमिक्री आर्टिस्ट लहान मुलासारखा बोलत होता. त्याला एवढंच सांगणं आहे, जेव्हा नक्कल तू करतोस, तेव्हा ती चांगली करायला हवी. कोणाचीही वाईट नक्कल करू नकोस.’
सुनील शेट्टीचा संताप पाहून त्या मिमिक्री आर्टिस्टने माफी मागितली. ‘सर, माफी असावी. मी आपली नक्कल करण्याचा अजिबात प्रयत्न करत नव्हतो,’ असे त्याने स्पष्ट केले. यावर सुनील शेट्टी म्हणाला, ‘बेटा, प्रयत्नदेखील करू नकोस. सुनील शेट्टी बनायला अजून वेळ आहे. केवळ केस बांधल्याने काही होत नाही. हा अजून लहान आहे, असे दिसते की याने सुनील शेट्टीचे अॅक्शन चित्रपट पाहिलेले नाहीत. कधी संधी मिळाल्यास मी ते आजमावूनही दाखवू शकेन.’
या वादानंतर सुनील शेट्टीने कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार मानले. मात्र, त्याचा असा संतप्त अवतार पाहून सर्वजण चकित झाले. सोशल मीडियावर या व्हिडिओवरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.