मनोरंजन

Kannada Movie : केवळ ४ कोटींचे बजेट, नफा तब्बल १५५० टक्के! ‘या’ कन्नड हॉरर-कॉमेडी चित्रपटाची यशस्वी घोडदौड

२०२५ मधील दुसरा सर्वाधिक नफा मिळवणारा चित्रपट ठरला आहे.

रणजित गायकवाड

su from so horror comedy kannada movie made in 4 crores earned 1550 percent profit

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. उत्तम कथानकांच्या जोरावर दाक्षिणात्य चित्रपट देशभरातील प्रेक्षकांची मनं जिंकत असतानाच, आता एका नव्या चित्रपटाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. केवळ ४ कोटी रुपयांच्या अल्प बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने तब्बल १५५०% इतका घसघशीत नफा कमावून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

कन्नड चित्रपटसृष्टीने पुन्हा एकदा आपल्या आशयघन चित्रपट निर्मितीची ताकद सिद्ध केली आहे. जे.पी. तुमनाड लिखित, दिग्दर्शित आणि अभिनीत ‘सू फ्रॉम सो’ या चित्रपटाने कोणत्याही मोठ्या कलाकारांशिवाय बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व यश मिळवले आहे. चित्रपटाच्या कमाईचे आकडे थक्क करणारे आहेत. यासोबतच हा चित्रपट अनेक नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. केवळ ४ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या हॉरर-कॉमेडी चित्रपटाने भारतात आतापर्यंत ६५.९९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या कामगिरीमुळे हा चित्रपट २०२५ मधील दुसरा सर्वाधिक नफा मिळवणारा चित्रपट ठरला आहे.

‘सू फ्रॉम सो’चे कथानक काय आहे?

चित्रपटाची कथा कर्नाटकातील एका लहान किनारी गावात राहणाऱ्या अशोक (जे.पी. तुमनाड) या तरुणाभोवती फिरते. अशोक एक मनमौजी तरुण आहे. त्याचे आयुष्य सामान्यपणे सुरू असतानाच, गावात अचानक एक अफवा पसरते की अशोकला एका स्त्रीच्या आत्म्याने पछाडले आहे. ही विचित्र सुरुवात लवकरच विनोद, भीती आणि भावनांनी भरलेल्या एका गंभीर सामाजिक कथानकात बदलते. या चित्रपटात विनोद, हॉरर आणि सामाजिक संदेश यांचा अनोखा मिलाफ पाहायला मिळतो, जो प्रेक्षकांना हसवण्यासोबतच विचार करण्यासही भाग पाडतो.

‘सू फ्रॉम सो’ चित्रपटाचे वैशिष्ट्य

दिग्दर्शक जे.पी. तुमनाड यांनी सांगितले की, हा चित्रपट त्यांच्या गावात घडलेल्या घटनांवरून प्रेरित आहे. कथानकातील प्रत्येक भावना अचूकपणे पडद्यावर उतरावी, यासाठी या चित्रपटाच्या पटकथेचे तब्बल २६ वेळा पुनर्लेखन केले. पण आता ती मेहनत पडद्यावर स्पष्टपणे दिसून येत आहे. चित्रपटातील सहकलाकार शनील गौतम (रवी अण्णा), संध्या अरकेरे (भानू), प्रकाश तुमनाड (चंद्र) आणि राज बी. शेट्टी यांनी आपापल्या भूमिकेला पुरेपूर न्याय दिला आहे, ज्यामुळे चित्रपटाला एक वेगळीच खोली आणि प्रामाणिकपणा प्राप्त झाला आहे.

बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड

विशेष प्रसिद्धी किंवा अपेक्षांशिवाय २५ जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या ‘सू फ्रॉम सो’ने पहिल्या दिवशी माफक सुरुवात केली. मात्र, दुसऱ्या दिवसापासूनच माउथ पब्लिसिटीचा सकारात्मक परिणाम दिसू लागला. चित्रपटाचे अनोखे कथानक, विनोद आणि भावनिक गुंफण यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आणि चित्रपटगृहांमध्ये गर्दी वाढू लागली. केवळ १९ दिवसांत या चित्रपटाने ६५.९९ कोटी रुपयांची कमाई केली. व्यापार विश्लेषक याला २०२५ मधील सर्वाधिक आश्चर्यकारक यशोगाथा मानत आहेत. चित्रपटाचा नफा सुमारे १५५० टक्के आहे.

ओटीटीवर प्रदर्शनासाठी सज्ज

चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर ‘सू फ्रॉम सो’ आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. व्यापार तज्ज्ञ रमेश बाबू यांच्या मते, हा चित्रपट सप्टेंबर महिन्यात ‘ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ’वर प्रदर्शित होणार आहे. तथापि, प्रदर्शनाची निश्चित तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. एखादा चित्रपट यशस्वी होण्यासाठी मोठे बजेट नव्हे, तर सशक्त विचार आणि उत्कृष्ट कथानकच महत्त्वाचे ठरते, हे ‘सू फ्रॉम सो’ ने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT