शुभविवाह नवी मालिका  
मनोरंजन

‘शुभविवाह’ नवी मालिका लवकरच भेटीला

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : नव्या वर्षात म्हणजेच १६ जानेवारीपासून शुभविवाह ही नवी मालिका सुरु होत आहे. शुभविवाह दुपारी २ वाजता सुरु होत आहे. बहिणीच्या स्वप्नासाठी आपलं आयुष्य पणाला लावणाऱ्या भूमीच्या त्यागाची गोष्ट म्हणजे शुभविवाह ही मालिका. मधुरा देशपांडे, यशोमन आपटे, विशाखा सुभेदार, कुंजिका काळविंट, अभिजीत श्वेतचंद्र, मृणाल देशपांडे, शीतल शुक्ल, मनोज कोल्हटकर, विजय पटवर्धन अशी कलाकारांची तगडी फौज मालिकेत आहे.

या मालिकेचं वेगळेपण सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, 'शुभविवाह ही नाते संबंध जपणारी कथा आहे. आयुष्य आपल्या समोर नेहमी एक आव्हान घेऊन उभं राहतं. ते आव्हान हसतमुखाने सामोरं जाणाऱ्या भूमी या मुलीची ही कथा आहे. विवाह बंधन हे शुभं असतं, एकमेकांच्या विश्वासाचं असतं. या मालिकेत हीच वचनं, हेच संबंध कसे टिकवून ठेवायचे हा प्रवास पाहायला मिळेल. आयुष्य सुंदर आहे, ते तसं पहाता आलं पाहिजे हे सांगणारी मालिका आहे शुभविवाह.'

या मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना अभिनेत्री मधुरा देशपांडे म्हणाली, 'स्टार प्रवाह वाहिनीसोबत पुन्हा एकदा काम करताना अतिशय आनंद होत आहे. भूमी हे पात्र साकारणं माझ्यासाठी नवं आव्हान आहे. कारण भूमीसारखी इतका पराकोटीचा त्याग करणारी व्यक्तिरेखा मी पहिल्यांदाच साकारते आहे. भूमीचे नवनवे पैलू मला दररोज उलगडत आहेत. आमची टीम खूप छान आहे. त्यामुळे शुभविवाहच्या निमित्ताने एक छान कुटुंब प्रेक्षकांच्या भेटीला येईल.'

भूमीच्या सावत्र बहिणीची म्हणजेच पौर्णिमा ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री कुंजिका काळविंट म्हणाली, 'मी गेले वर्षभर एका चांगल्या कथानकाच्या आणि चांगल्या पात्राच्या शोधात होते. शुभविवाह ही मालिका म्हणजे माझी स्वप्नपूर्ती म्हणता येईल. या मालिकेच्या निमित्ताने नव्या वर्षाची दमदार सुरुवात होणार आहे. पौर्णिमा या पात्राकडून खूप गोष्टी शिकायला मिळत आहेत. ही भूमिका साकारताना माझा कस लागतोय असं म्हटले तरी वावगं ठरणार नाही. स्टार प्रवाहसोबत माझी पहिली मालिका आहे त्यामुळे खूपच उत्सुकता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT