Shreyas Talpade fraud case Pudhari
मनोरंजन

Shreyas Talpade: कोट्यवधींच्या आर्थिक गैरव्यवहार! अभिनेता श्रेयस तळपदे अडचणीत; न्यायालयाच्या आदेशानंतर FIR दाखल

Shreyas Talpade Fraud Case: उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील कथित बँक घोटाळ्यात अभिनेता श्रेयस तळपदे याच्यासह 12 जणांविरोधात एफआयआर दाखल झाला आहे.

Rahul Shelke

Shreyas Talpade Fraud Case: मोठ्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात अभिनेता श्रेयस तळपदे यांचं नाव आलं आहे. उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील भोगांव पोलीस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशानंतर श्रेयस तळपदे याच्यासह एकूण 12 जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रातील सागा ग्रुप या समूहाने विविध राज्यांमध्ये सुरू केलेल्या तथाकथित बँक शाखांमधून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आला. मैनपुरी परिसरातच सुमारे 30 कोटी रुपयांहून अधिक रक्कम अडकली असल्याचा दावा पीडितांनी केला आहे.

... त्यामुळे लोकांचा विश्वास बसला

पीडितांनी न्यायालयात दिलेल्या अर्जात सांगितलं की, सागा ग्रुपशी संबंधित LUCC नावाची शाखा 2015 मध्ये उघडण्यात आली होती. ही शाखा सरकारी बँकेसारखीच व्यवहार करत असल्याने स्थानिक नागरिकांचा विश्वास बसला आणि शेकडो लोकांनी आपल्या मेहनतीचा पैसा येथे गुंतवला.

नंतर पैसे परत मागितल्यावर संचालक समीर अग्रवाल आणि त्यांच्या पत्नी सानिया अग्रवाल यांनी टाळाटाळ सुरू केली. उलट, पैसे मागितले तर खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याच्या धमक्याही दिल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये ही शाखा अचानक बंद पडली आणि कर्मचारीही गायब झाले. मात्र गुंतवणूकदारांकडे सर्व कागदपत्रे असूनही त्यांची रक्कम परत मिळालेली नाही.

पोलिसांनी दखल न घेतल्याने पीडित कोर्टात

सुरुवातीला भोगांव पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती, मात्र एफआयआर दाखल झाला नाही. अखेर पीडितांनी न्यायालयाची दारं ठोठावली. कोर्टाच्या आदेशानंतर समीर अग्रवाल, सानिया अग्रवाल, काही व्यवस्थापक कर्मचारी आणि अभिनेता श्रेयस तळपदे याच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात उत्तराखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्येही अशाच प्रकारे फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पुढे काय?

सध्या पोलिसांकडून तपास सुरू असून, संबंधित कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. गुंतवणूकदारांची अडकलेली रक्कम परत मिळणार का, आणि या प्रकरणात श्रेयस तळपदे याची भूमिका नेमकी काय होती, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सरकारी बँकेसारखं भासवून लोकांचा विश्वास संपादन केला गेला आणि नंतर कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला, असा गंभीर आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे. आता न्यायालय आणि पोलिस तपासातूनच सत्य समोर येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT