‘वीरू‌’च्या जाण्याने ‌‘जय‌’ झाला पोरका 
मनोरंजन

Dharmendra Passed Away: ‘वीरू‌’च्या जाण्याने ‌‘जय‌’ झाला पोरका

पुढारी वृत्तसेवा

‌‘ये दोस्ती हम नहीं छोडेंगे‌’

शोले सिनेमातील ‌‘वीरू‌’ प्रत्यक्षात ‌‘जय‌’ला सोडून गेला. रुग्णवाहिकेतून धर्मेंद्रचे पार्थिव स्मशानभूमीकडे नेत असतानाच्या दृश्यांवेळी टीव्हीवर हेच गाणे बॅकग्राऊंडला वाजवले जात होते.

  • सिनेमा हा समाजाचे प्रतिबिंब असल्याची जाणीव निर्माण करणाऱ्या कलाकारांमध्ये धर्मेंद्र यांचा अग्रक्रमाने उल्लेख केला जातो.

  • 8 डिसेंबर 1935 रोजी लुधियाना जिल्ह्यातील साहनेवाल येथे एका जाट कुटुंबात त्यांचा जन्म झाला.

  • त्यांचे मूळ नाव धरम सिंह देओल असून वडील शाळेचे हेडमास्टर असल्याने घरात शिस्त आणि साधेपणाचे वातावरण होते.

  • लालनटन कला शाळेतून त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले आणि पुढे फगवाडा येथील रामगढिया कॉलेजमध्ये बारावीपर्यंत त्यांनी शिक्षण घेतले.

  • शिक्षण पुढे सुरू ठेवण्याची इच्छा असूनही अभिनयाविषयीची अतीव ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. अखेरीस त्यांनी याच क्षेत्रात करिअर करण्याचा निर्धार पक्का केला.

  • किशोरवयातच त्यांना दिलीप कुमार यांनी जबरदस्त प्रेरित केले आणि याच प्रेरणेने मुंबई गाठण्याचा निर्णय घेतला.

  • पंजाबमधून मुंबईत आल्यावर संघर्षाने सुरुवातीची सर्व दारे बंद केल्याचे वाटले. परंतु त्यांनी धीर सोडला नाही.

  • फिल्मफेअर न्यू टॅलेंटचा पुरस्कार जिंकल्यानंतर त्यांना पहिली मोठी संधी मिळाली.

  • 1960 मधील ‌‘दिल भी तेरा हम भी तेरे‌’ या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला.

  • पहिला चित्रपट विशेष चालला नसला तरी धर्मेंद्र यांच्या व्यक्तिमत्त्वाने दिग्दर्शकांचे आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

  • 1961 नंतर ‌‘शोला और शबनम‌’, ‌‘अनपढ‌’, ‌‘बंदिनी‌’ अशा चित्रपटांमधून ते रोमँटिक नायक म्हणून लोकप्रिय झाले.

  • 1966 मधील ‌‘फूल और पत्थर‌’ हा त्यांच्यासाठी करिअरचा खरा टर्निंग पॉईंट ठरला. या चित्रपटातील ताकदवान ॲक्शन भूमिकेमुळे ते एका रात्रीत देशभरात ही मॅन म्हणून ओळखले जाऊ लागले. या भूमिकेसाठी त्यांना प्रथमच फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेता नामांकनही मिळाले.

  • 1975 मधील ‌‘शोले‌’मधील वीरू ही भूमिका भारतीय सिनेमाच्या इतिहासात अमर झाली आणि धर्मेंद्र यांना कालातीत लोकप्रियता मिळाली.

  • हेमा मालिनीसमवेतचे त्यांचे संवाद, विनोद आणि ॲक्शन यांनी धर्मेंद्र यांना प्रचंड स्टारडम मिळवून दिले.

  • प्रकाश कौर यांच्याशी झालेल्या पहिल्या विवाहातून सनी, बॉबी, अजीता आणि विजेता ही तीन अपत्ये झाली.

  • 1980 मध्ये त्यांनी हेमा मालिनी यांच्याशी विवाह केला. धर्मेंद्र व हेमा यांना ईशा व अहाना या दोन मुली आहेत.

  • धर्मेंद्र यांनी कोणत्याही गॉडफादरशिवाय फक्त स्वतःच्या मेहनतीने हिंदी चित्रपटसृष्टीत स्थान निर्माण केले.

  • ‌‘चरस‌’, ‌‘यादों की बारात‌’, ‌‘सीता और गीता‌’, ‌‘धरमवीर‌’, ‌‘चुपके चुपके‌’ अशा विविध शैलीतील चित्रपटांत त्यांनी प्रभावी कामगिरी केली.

  • अभिनयासोबतच त्यांनी निर्मिती क्षेत्रातही पाऊल टाकले आणि अनेक प्रकल्पांना दिशा दिली.

  • 2004 मध्ये ते बिकानेर येथून लोकसभेवर निवडून आले आणि 2009 पर्यंत संसद सदस्य राहिले. संसदेत त्यांच्या उपस्थितीचे प्रमाण कमी राहिल्याचेही वारंवार निदर्शनास आणले गेले. कारण ते अनेकदा शूटिंग किंवा आपल्या फार्महाऊसवरील वास्तव्यास गुंग असत. या कारणास्तव त्यांना टीकेचा सामना करावा लागला असला तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबाबत लोकांचा प्रेमभाव कायम राहिला.

  • भारतीय सिनेमातील योगदानाबद्दल 1997 मध्ये फिल्मफेअर लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड आणि 2012 मध्ये पद्मभूषण देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

  • त्यांच्या कष्ट, स्वभावातील साधेपणा आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्त्वामुळे ते भारतीय प्रेक्षकांच्या मनात प्रदीर्घ काळ स्मरणात राहतील.

  • साहनेवालच्या साध्या गावातून मुंबईपर्यंतचा हा प्रवास एका कलाकाराच्या अढळ जिद्दीचा, अथक मेहनतीचा आदर्श मानला जातो.

  • धर्मेंद्र यांच्याबाबत एक किस्सा सांगितला जातो, तो म्हणजे त्यांनी काही वर्षांपूर्वी 18 हजार रुपयांना एक फियाट कार खरेदी केली होती. त्या काळात ही फार मोठी रक्कम मानली जायची. विशेष म्हणजे शेवटपर्यंत त्यांनी ही गाडी बरीच वर्षे व्यवस्थित जपून ठेवली होती. 2021 साली धर्मेंद्र यांनी याच कारसोबत एक भावनिक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये त्यांनी म्हटले होते, मित्रांनो, ही फियाट माझी पहिली कार होती. एका स्ट्रगल करणाऱ्या माणसासाठी हे देवाचे मोठे आशीर्वाद होते. तिच्यासाठी प्रार्थना करा, ती नेहमी माझ्यासोबत राहो.

  • धर्मेंद्र यांनी 300 हून अधिक मुलाखती नाकारल्याचे सांगितले जाते. यामागचे कारण म्हणजे ते म्हणत असत की, मी बोलण्यापेक्षा काम जास्त करतो. 1960 ते 1985 या कालावधीत ते फारच कमी मुलाखती द्यायचे. त्यामुळे त्यांना ‌‘द सायलेंट सुपरस्टार‌’ असेही म्हटले जायचे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT