

नाशिक : बॉलिवूड अभिनेता धर्मेंद्र यांचे सोमवारी (दि. 24) निधन झाले. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणींना प्रत्येक क्षेत्रातून उजाळा दिला जात आहे. चित्रपट शुटींगच्या निमित्ताने अनेक शहरे आणि गावांशी त्यांची नाळ जोडली होती. अशीच एक नाळ धर्मेंद्र यांची नाशिकसोबत देखील जुळली होती. चित्रीकरणासाठी ते महिनाभर नाशिकला मुक्कामी होते. तसेच हेमा मालिनी यांच्या भेटीसाठी ते काही वर्षांपूर्वी २४ तासांत बेंगळुरूहून नाशिकला आले होते.
धर्मेंद्र महिनाभर नाशिकच्या ओढा, गंगापूर तथा दिंडोरी परिसरात त्यांच्या 'प्रतिज्ञा' या सिनेमाचे चित्रीकरण करण्यासाठी आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा 'दावेदार' च्या चित्रीकरणासाठी नाशिकच्या गंगापूर परिसरात आले होते. जुन्या नाशिकमधील रहिवासी ओमकारशेठ घोडके यांचा टॅक्सी चालवण्याचा व्यवसाय होता. सुमारे पन्नास ते साठ वर्षांपूर्वी त्यावेळचा हा व्यवसाय म्हणजे बर्यापैकी नाविन्याची गोष्ट होती. नाशिकमध्ये टॅक्सीसेवा ही त्याकाळी बाहेरून येणार्या बड्या ग्राहकांकडूनच वापरली जात असे. १९७३- ७४ चा सुमारास माजी आमदार नितीन भोसले यांचे वडील केशवराव भोसले यांच्याकडून ओमकार घोडके यांना अचानक धर्मेंद्र यांना टॅक्सीसेवा उपलब्ध करुन देण्याचे काम देण्यात आले होते.
नाशिक शहरातील पाच ते सहा नव्या कोर्या टॅक्सीज या चित्रीकरणासाठी घेण्यात आल्या होत्या. घोडकेंचे नशिब एवढे बलवत्तार की त्यांच्याच गाडीत धर्मेंद्र बसत असत. साधारणत: महिनाभर नाशिकच्या ओढा, गंगापूर तथा दिंडोरी परिसरात त्यांच्या 'प्रतिज्ञा' या सिनेमाचे चित्रीकरण झाले होते. आणि त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणाहून म्हणजे त्या वेळेस नव्यानेच सुरु झालेल्या हॉटेल ग्रीन व्ह्यू येथून त्यांना रोज सकाळी चित्रीकरण स्थळी घेऊन जाणे आणि दुपारी किंवा सायंकाळी परत घेऊन येणे हे ते काम होते. साक्षात धर्मेंद्र आपल्या गाडीत बसून जात आहेत ही वयाच्या तीशीतील घोडके मामांसाठी मोठी आश्चर्याची तथा आनंदाची गोष्ट होती.
अन् देवीची झाली स्थापना
दावेदार चित्रपटाचे चित्रीकरण करण्यासाठी धर्मेंद्र गंगापूर धबधब्या जवळ झाले होते. त्यासाठी एक मंदीर तात्पुरते बांधले गेले होते. त्यातील देवी नंतर शालीमार येथील येथील देवी मंदीरात स्थापना करण्यात आली. त्यावेळेची आठवण नाशिकचे सराफ कृष्णा नागरे यांच्या आजही स्मरणात आहे. त्यावेळी मी चौथीत शिकत होतो. दावेदारचे चित्रीकरण पाहण्यासाठी शाळा बुडवुन गेलो. परंतु येतांना बसची वाट पाहत असतांना धमेंंद्र यांनी मला नाशिकला सोडले होते. लहाणपणी त्याचे महत्व कळले नाही. मात्र नंतर ती आठवण कायम स्मरणात राहिली, असे त्यांनी सांगितले.
धर्मेंद्र यांचा नाशिकमध्ये झाला होता गौरव
नाशिकच्या मुकेश कुमार यांनी सांगितले की, धर्मेंद्र यांच्यासोबत माझा अनेक वर्षांचा संबंध होता. त्यांना नाशिकमध्ये २००९ साली कालिदास कलामंदिर येथे मंत्री छगन भुजबळ, शोभा बच्छाव यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यावेळी धर्मेंद्र यांना दादासाहेब फाळके जन्म पुरस्कार, गोल्डन कॅमेरा अवार्ड, एक ट्रॉफी,सन्मान पत्र आणि एक लाख रुपये रोख असे पारितोषिक दिले होते. धर्मेंद्र यांनी त्या कार्यक्रमात बोलतांना दादासाहेब फाळके यांचे जन्म स्थान आमच्यासाठी पंढरी असून, ते जर नसते तर आम्ही कोणीच आज चित्रपटसृष्टीत नसतो, असे म्हटले होते.