

प्रभाकर तांबट
प्रतिज्ञा चित्रपट करताना एका प्रसंगी त्याला नृत्य करायचे होते. तसे नृत्याचे बाबतीत तो ‘ढ’. या चित्रपटाचे नृत्य दिग्दर्शन गोपीकृष्ण यांचे. त्यांनी जयमाला कार्यक्रमात त्याच्या तगड्या देहयष्टीला शोभेल अशा स्टेप्स, त्याही समूह नृत्यात खपून जाईल अशा बसवून ‘मैं जट पगला यमला दीवाना ओ रब्बा’ हे गाणे चित्रित केले, अशी आठवण सांगितली होती. याच गाण्याचे नावाचे दोन चित्रपट, भाग एक व दोन असे त्याने नंतर केले.
आपल्या दमदार अभिनयाने आणि ‘ही मॅन’ या प्रतिमेने तब्बल सहा दशके प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे सोमवारी सकाळी मुंबईत निधन झाले. त्यांची कारकीर्द, विख्यात निर्माते दिग्दर्शक बिमल रॉय यांच्या 1963 साली आलेल्या ‘बंदिनी’तील डॉक्टरच्या भूमिकेतून सुरू झाली. खरं तर बंदिनी झालेल्या नूतनच्या अभिनयाने जरी हा चित्रपट ओळखला जातो तरी बिमलदांनी या डॉक्टरच्या भूमिकेसाठी या पंजाबी नवशिक्या तरुणाला ही भूमिका दिली हे विशेष! बिमलदांना हा तगडा, आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेला तरुण आवडला, तो त्याचा 1960 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ ह्या चित्रपटातील कुमकुमबरोबरची त्याची भूमिका पाहून. बिमलदांनी चमकवले म्हटल्यावर त्यांचे सहायक व नंतर मोठे नाव असलेल्या दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांनी. पण पहिली काही वर्षे तो मीनाकुमारी आणि माला सिन्हा यांच्याबरोबर कामे केल्याने प्रसिद्ध झाला.
माला सिन्हाबरोबर त्याने मदनमोहन यांचे संगीताने गाजलेल्या ‘अनपढ’ व ‘पूजा के फूल’मध्ये भूमिका केल्या. त्याचा पहिला आणि गाजलेला चित्रपट होता ‘फूल और पत्थर’. मीनाकुमारीबरोबर तो होता. शिवाय गुन्हेगार नायक ही भूमिका त्याने समर्थपणे पेलली. यात त्याच्या पिळदार उघड्या शरीराचे दर्शन प्रेक्षकांना झाले. तिथून पुढे तो ‘ही मॅन’ म्हणून ओळखला जाऊ लागला. पुढेही ‘काजल’, ‘धरमवीर’मधून त्याचे कमावलेले पिळदार शरीर दिसले. मुंबईतील त्याच्या बंगल्यात अत्याधुनिक व्यायामशाळा होती. आपला बंगला तो निर्मात्यांना शूटिंगसाठी द्यायचा. तो मुंबईत नसताना त्याच्या वडिलांनी, मराठी निर्माते दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांना आपला बंगला शूटिंगला विनामूल्य दिला, अशी आठवण त्यांनी आपल्या आत्मचरित्रात (गंध फुलांचा) नोंदवली आहे.
मला वाटते, त्याने जे दर्जेदार चित्रपट केले, ते प्रामुख्याने हृषिकेश मुखर्जी या दिग्गज नामांकित दिग्दर्शकाकडे. खरं तर त्यांच्या ‘गुड्डी’ या गाजलेल्या चित्रपटातील भूमिका हिंदी चित्रपटातील नायकाचे वास्तव रूप दाखवणारी होती. तरीही त्याने ती साकारली. यात शूटिंग दरम्यान (चित्रपटात) एक स्पॉटबॉय मरण पावल्यावर शूटिंग थांबले असताना तो त्याच्या दु:खाने उद्विग्न होऊन सुन्न बसलेला असतो. तेवढ्यात तिथे एक पत्रकार मुलाखत द्या, म्हणून अजीजी करतो. तो त्याची विनंती त्या अवस्थेत असताना धुडकावतो. पण जेव्हा तो पत्रकार आज मी मुलाखत घेऊन ती संपादकांना दिली नाही तर माझी नोकरी जाईल म्हणून काकुळतीने सांगतो. मग मात्र सहृदयता दाखवून तो त्याला मुलाखत देताना दाखवला आहे. तसेच ‘अनुपमा’, ‘सत्यकाम’, ‘चुपके चुपके’सारखे अभिजात चित्रपट त्याने हृषिदांकडे केले. तर राज कपूरसारख्या दिग्गजाने आपल्या महत्त्वाकांक्षी ‘मेरा नाम जोकर’ चित्रपटातील दुसऱ्या भागात सर्कसमध्ये त्याला ट्रॅपिजवर कसरत करताना घट्ट कपड्यातून त्याच्या पिळदार शरीराचे दर्शन दाखवले. हा त्याच्या दृष्टीने बहुमान होता.
हा अभिनेता तरुण असल्यापासून चित्रपट शौकीन. किती, ते या उदाहरणावरून दिसून येते. शालेय जीवनात असताना सहनेवाल (पंजाब) या आपल्या गावातून सायकल दामटत, वीसेक मैल अंतरावर असलेल्या थिएटरला जाऊन चित्रपट पाहायला जात होता. असे जाऊन श्याम, सुरैया जोडीचा नौशादनी संगीताने गाजवलेला ‘दिल्लगी’ त्याने तीस-चाळीस वेळा पाहिला होता. तोच काय, पण सुरैयाचे ‘बडी बहन’, ‘रुस्तुम सोहराब’, ‘विद्या’, ‘शमा’, ‘अनमोल घडी’ या चित्रपटांतील संवाद व गाणी त्याला तोंडपाठ होती. एका पार्टीत सुरैया आपणाला आता कोणी ओळखत नाही म्हणून एका बाजूला निवांत बसून असताना धर्मेंद्रने तिला जवळ जाऊन ‘आप सुरैयाजी है ना’ म्हणून विचारून खात्री केली. तिथून पुढे अर्धा - पाऊण तास तो तेव्हा प्रसिद्धीच्या शिखरावर होता तरी त्याने सुरैयाला, मी तुमचा चाहता आहे, हे सांगितले व तिला तिचे संवाद व गाणी ऐकवली. ती अक्षरशः थक्क झाली. पार्टी एका बाजूला व हे दोघे एका बाजूला.
पण शर्मिला टागोरबरोबर वर उल्लेख केलेले ‘अनुपमा’ वगैरे चित्रपट वगळून ‘देवर’ चित्रपट केला, ज्यात देवेन वर्मा तिचा नवरा असतो. विशेष गोष्ट म्हणजे दोघांचा वाढदिवस आठ डिसेंबरला. देवरशिवाय ‘मेरे हमदम मेरे दोस्त’ हा आणखी एक चित्रपट. पण सर्वात गाजली ती त्याची ‘शोले’तील वीरूची भूमिका. यातील शंकराच्या देवळात जेव्हा तो बसंती झालेल्या हेमा मालिनीला बोलावतो आणि साक्षात भगवान शंकर बोलत आहेत असे तिला भासवितो आणि मित्र जय तिला मूर्तीमागून बोलणारा वीरू दाखवतो... तो प्रसंग अफाट आहे. याच वेळी हेमामालिनी बरोबर प्रथम पत्नी प्रकाश असताना त्याने लग्न केले.
या त्याच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा भारतीय संसदेत झाली हे विशेष! परंतु पडदा प्रेमींनी, पडद्यावर व बाहेर या जोडीला उचलून धरले. त्यांचा सर्वात जास्त गाजलेला चित्रपट होता ‘सीता और गीता’. यात तो गीताचा प्रियकर आहे. नेहमी घागरा चोळी घालणारी व मुलांत खेळणारी ही गीता अंगभर साडी नेसून त्याला ‘कहिये जी, सुनिये जी’ करून लाजून बोलणाऱ्या रूपात प्रकट होते तेव्हा असे साडी सावरत बोलून तो तिची नक्कल करतो हा प्रसंग. तसेच फाटलेला सदरा शिवण्यासाठी तो एक डोळा बारीक करून सुईत दोरा ओवायचा प्रसंग खूप विनोदी. दोन्ही प्रसंग प्रेक्षकांच्या लक्षात राहणारे होते. नंतर ‘नया जमाना’, ‘जुगनू’, ‘ड्रीम गर्ल’ हे व ‘रझिया सुलताना’ तसेच ‘अलिबाबा और चालीस चोर’ हे सर्व चित्रपट गाजले. एक तिच्याबरोबरचे द्वितीय विवाह प्रकरण व दुसरे देवयानी चौबळ या बोल्ड गॉसिप लिहिणाऱ्या सिनेपत्रकाराबरोबर, तिने आपल्याविषयी काहीबाही लिहिले म्हणून, मारण्याच्या उद्देशाने केलेला तिचा पाठलाग वगळता तो कधी चर्चेत आला नाही.
‘मेरा गांव मेरा देस’ चित्रपट गाजला तो धर्मेंद्रबरोबर, समोर असलेल्या तितक्याच बलदंड अभिनेता विनोद खन्ना या दोघांच्या मारामारीमुळे. पण मीनाकुमारीबरोबरच वैजयंतीमाला बरोबर तो ‘प्यार ही प्यार’ चित्रपटात नायक होता. नूतनबरोबर ‘दिल ने फिर याद किया’ हा चित्रपट केला; तर दिग्दर्शक असित सेन यांच्या क्लासिक गणलेल्या ‘खामोशी’ चित्रपटात तो नर्स झालेल्या वहिदा रेहमानचा पहिला मनोरुग्ण प्रियकर आहे, ज्याचे अस्तित्व शेवटपर्यंत जाणवते. या उमद्या मनाच्या कलाकारास सविनय आदरांजली.
धर्मेंद्रचे गाजलेले 51 चित्रपट, सहकलाकार व नायिका
1) शोले : 1975 - अमिताभ बच्चन, हेमा मालिनी
2) चुपके चुपके : 1975 - अमिताभ बच्चन, शर्मिला टागोर
3) सत्यकाम : 1969 - अशोक कुमार, शर्मिला टागोर
4) हकीकत : 1964 - बलराज सहानी, प्रिया राजवंश
5) यादों की बारात : 1973 - विजय अरोरा, झीनत अमान
6) अनुपमा : 1966 - देवेन वर्मा, शर्मिला टागोर
7) सीता और गीता : 1972 - संजीवकुमार, हेमा मालिनी
8) प्रतिज्ञा : 1975 - अजित, हेमामालिनी
9) फूल और पत्थर : 1966 - मीनाकुमारी
10) बंदिनी :1963 - अशोक कुमार, नूतन
11) धरमवीर : 1977 - जितेंद्र, झीनत अमान
12) द बर्निंग ट्रेन : 1980 - विनोद खन्ना, हेमा मालिनी
13) मेरा गाव मेरा देश : 1971 - विनोद खन्ना, आशा पारेख
14) जीवन मृत्यू : 1970 - अजित, राखी
15) नया जमाना : 1971 - अशोक कुमार, हेमा मालिनी
16) जुगनू : 1973 - प्राण, हेमामालिनी
17) जॉनी गद्दार : 2007 - गोविंद नामदेव, रिमी सेन
18) गुलामी : 1971 - मिथुन चक्रवर्ती
19) गुड्डी : 1971 - जया बच्चन
20) आँखे : 1968 - माला सिन्हा, धुमाळ
21) दोस्त : 1974 - शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी
22) चरस : 1976 - अजित, हेमा मालिनी
23) अपने : 2007 - सनी देओल
24) रॉकी और रानी की प्रेमकहानी : 2023 - रणवीर सिंह
25) दिल्लगी : 1978 - हेमा मालिनी
26) समाधी : 1972 - आशा पारेख
27) प्यार किया तो डरना क्या : 1998 - सलमान खान
28) लाईफ इन मेट्रो : 2007 - गौतम कपूर
29) ज्वार भाटा : 1973 - सुजित कुमार, सायरा बानू
30) शालीमार : 1978 - टेक्स हॅरिसन, झीनत अमान
31) बगावत : 1982 - अमजद खान, हेमा मालिनी
32) राम बलराम : 1983 - अमिताभ बच्चन, झीनत अमान
33) नौकर बीवी का : 1983 - विनोद मेहरा, अनिता राज
34) यमला पगला दिवाना : 2010- मुकेश अनिल, नफिसा अली
35) आजाद : 1978 - प्रेम चोप्रा, हेमा मालिनी
36) कांकन दे ओहले : 1970 - रवींद्र कुमार, इंदिरा
37) इश्क पर जोर नही : 1970 - विश्वजित, साधना
38) ड्रीम गर्ल : 1977 - अशोक कुमार, हेमा मालिनी
39) इंटरनॅशनल क्रूक : 1974 - फिरोज खान, सायरा बानू
40) राजपूत : 1982 - राजेश खन्ना, हेमा मालिनी
41) आयी मिलन की बेला : 1964 - राजेंद्र कुमार, सायरा बानू
42) अलिबाबा और चालीस चोर : 1980- प्रेम चोप्रा, झीनत अमान
43) राजा जानी : 1972 - प्रेमनाथ, हेमा मालिनी
44) लोफर : 1973 - रुपेश कुमार, मुमताज
45) तेरी बातों में ऐसा उलझा गया : 2024- शाहीद कपूर, क्रिती सेनॉन
46) बटवारा : 1989 - विनेाद खन्ना, डिंपल कापडिया
47) आदमी और इन्सान : 1969 - फिरोज खान, सायरा बानू
48) लोहा : 1987 - शत्रुघ्न सिन्हा
49) जागीर : 1984 - मिथुन चक्रवर्ती, झीनत अमान
50) चाचा भतीजा : 1977 - रणधीर कपूर, हेमा मालिनी
51) मेरे हमदम मेरे दोस्त : 1968 - रेहमान, मुमताज