Shefali Jariwala beauty treatment details
मुंबई : ‘कांटा लगा’ या गाण्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचा वयाच्या ४२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक मृत्यू झाला. २७ जूनच्या रात्री ही दुःखद घटना घडली. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केली असून, शेफाली सुंदर दिसण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून विशेष उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेफाली तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी अंधेरीतील एका डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत होती. यामध्ये ती व्हिटॅमिन सी आणि ग्लुटाथिओन या औषधांचे डोस घेत होती. त्वचा उजळ आणि तरुण दिसण्यासाठी हे उपचार घेतले जातात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
शेफालीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ती गेल्या ६ ते ७ वर्षांपासून हे उपचार घेत होती. मात्र, या उपचारांचा तिच्या आरोग्यावर कोणताही गंभीर परिणाम होण्यासारखा नव्हता, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. डॉक्टरांनी पुढे सांगितले की, शेफाली अत्यंत तंदुरुस्त होती आणि तिने कधीही कोणत्याही आजाराबद्दल तक्रार केली नव्हती.
शेफालीच्या मृत्यू प्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात चौकशी सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी तिच्या अंधेरी येथील ‘गोल्डन रेझ’ या इमारतीतील घरी जाऊन फॉरेन्सिक टीमच्या मदतीने तपासणी केली. घरातील नोकर आणि स्वयंपाकी यांची चौकशी करण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी शेफालीचा पती पराग त्यागी याचा जबाब नोंदवला आहे. आतापर्यंत पतीसह एकूण चार जणांचे जबाब नोंदवण्यात आले असून, पोलिसांना अद्याप कोणतीही संशयास्पद बाब आढळलेली नाही. शेफालीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला असून, त्यावेळी तिचे वडील आणि बहीण उपस्थित होते. शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपासानंतरच तिच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.