Shefali Jariwala
नवी दिल्ली : 'कांटा लगा गर्ल' अभिनेत्री शेफाली जरीवालावर काळी जादू करण्यात आली होती, त्यामुळेच तिचा मुत्यू झाला, असा दावा तिचा पती पराग त्यागी याने केला आहे. एका पॉडकास्टमध्ये परागने हा खळबळजनक दावा केला आहे आणि हे पूर्ण सत्य असल्याचे म्हटले आहे.
शेफाली जरीवालाच्या निधनाने तिचे मित्र आणि कुटुंबीय धक्क्यात आहेत. संपूर्ण मनोरंजन सृष्टीला मोठा धक्का बसला होता. तिचा पती पराग त्यागी अजूनही या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या पत्नीच्या आठवणीत जीवन समर्पित करणाऱ्या परागने अलीकडेच शेफालीच्या मृत्यूबद्दल एक दावा केला आहे. पारस छाबडाच्या पॉडकास्टमध्ये परागने दावा केला आहे की, त्याच्या पत्नीवर काळी जादू करण्यात आली होती.
काळ्या जादूच्या दाव्याबद्दल बोलताना पराग म्हणाला, "खूप लोक या गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत, पण माझा यावर खूप विश्वास आहे. जिथे देव आहे तिथे सैतानही आहे. लोकांना स्वतःच्या दुःखापेक्षा दुसऱ्याच्या सुखाचे जास्त दुःख आहे. मला नक्की माहित आहे की हे कोणी केले आहे. मी त्याच नाव घेऊ शकत नाही, पण कोणीतरी नक्कीच केले आहे आणि मला काहीतरी अघटित घडत असल्याचे जाणवत होते. एकदा नाही तर दोनदा मला असे वाटले. पहिल्यांदा ती त्यातून बाहेर पडली, पण यावेळी परिस्थिती खूप गंभीर होती. मला माहित नाही नक्की काय होते ते."
पॉडकास्टमध्ये त्याने पुढे सांगितले की, शेफालीवर काळी जादू होण्याची ही दुसरी वेळ होती. तो म्हणाला, "जेव्हा मी पूजेला बसतो, तेव्हा मला जाणवते की काहीतरी चुकीचे आहे. ती खूप आनंदी मुलगी होती. मी तुम्हाला नेमकी लक्षणे सांगू शकणार नाही आणि मला त्यात जास्त खोलवरही जायचे नाही, पण तिला स्पर्श केल्यावर मला समजायचे की काहीतरी गडबड आहे. यावेळी त्रास जास्त होता, म्हणून मी पूजाही करून घेतली होती. मला पूर्ण खात्री आहे की हे कोणीतरी मुद्दाम केले आहे."
शेफाली जरीवालाचे २७ जून रोजी हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले होते. शेफालीला तिच्या पहिल्या 'कांटा लगा' या गाण्यासाठी सर्वात जास्त ओळखले जाते.