Kolhapur News: काळी जादू, नग्न विधी.. उदगावच्या स्मशानभूमीत अंधश्रद्धेचा कळस, भानामतीचा प्रकार CCTV त कैद
Blind Faith Case In Kolhapur Watch CCTV
कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील उदगाव येथील स्मशानभूमीत अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिला आणि पुरुषांकडून नग्न होऊन करणी, भानामतीसारखे अघोरी कृत्य केले जात असल्याचे समोर आले असून हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे उदगाव आणि जयसिंगपूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
भरदिवसा अघोरी कृत्य
उदगावमधील कृष्णा नदीकाठावर असलेल्या वैकुंठधाम स्मशानभूमीत गेल्या अनेक दिवसांपासून हा धक्कादायक प्रकार सुरू होता. येथे महिला आणि पुरुष भरदिवसा नग्न होऊन करणी, भानामतीसारखे विधी करत होते. स्मशानभूमीतील अंत्यसंस्कार केलेल्या जागेवरील रक्षा बाजूला सारून त्याठिकाणी बाहुली, नारळ यांची पूजा केली जात होती. तसेच, नावाच्या चिठ्ठ्यांना सुया टोचून करणी करण्याचा प्रकारही उघडकीस आला आहे.
परिसरात भीतीचे वातावरण
सातत्याने सुरू असलेल्या या अघोरी प्रकारामुळे उदगाव, जयसिंगपूर, संभाजीपूर, चिपरी बेघर, धरणगुत्ती (लक्ष्मीनगर), मौजे आगर या भागांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या सर्व गावांतील मृतांवर उदगाव येथील वैकुंठधामातच अंत्यसंस्कार केले जातात. त्यामुळे या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि चिंतेचे वातावरण आहे.
सीसीटीव्हीत प्रकार कैद
स्मशानभूमीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे सर्व किळसवाणे प्रकार कैद झाले आहेत. या फुटेजच्या आधारे पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती आहे. अशा घटनांमुळे समाजातील अंधश्रद्धेची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, हे स्पष्ट होते. या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

