मुंबई : अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या (Shefali Jariwala) आकस्मिक निधनाने तिचा पती पराग त्यागी (Parag Tyagi) आणि संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेफालीच्या अंत्यसंस्कारावेळी तिच्या आईने हंबरडा फोडला, तर पती पराग पूर्णपणे खचून गेला होता. पत्नीच्या निधनानंतर आता पराग त्यागीने पहिल्यांदाच माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
वयाच्या ४२ व्या वर्षी शेफाली जरीवालाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याच्या बातमीने केवळ चित्रपटसृष्टीच नव्हे, तर तिच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारी (27 जून) रात्री हृदयविकाराच्या झटक्याने तिचे निधन झाल्याचे म्हटले जात आहे. शनिवारी (दि.28) सायंकाळी शवविच्छेदनानंतर मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत शेफालीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तिच्या आईची अवस्था अत्यंत बिकट होती. वडील आणि पती पराग त्यागी यांच्यासह संपूर्ण कुटुंब शोकात बुडाले होते.
पराग त्यागीचे शेफालीवर जीवापाड प्रेम होते. तिच्या जाण्याने तो आतून पूर्णपणे तुटून गेला आहे. पत्नीला अखेरचा निरोप देताना त्याने तिच्या कपाळावर चुंबन घेतले आणि तिच्या केसांवरून हात फिरवला. एका व्हिडिओमध्ये तो ढसाढसा रडतानाही दिसला.
शेफालीच्या निधनानंतर पराग त्यागीने अखेर मौन सोडले. पत्नीच्या अंत्यसंस्कारानंतर घरी परत जात असताना त्याने माध्यमांशी संवाद साधला. तो म्हणाला, "माझ्या परीसाठी प्रार्थना करा. ती जिथे कुठे असेल, तिथे आनंदी राहो. शांत राहो, फक्त एवढी प्रार्थना करा. प्लीज, आता हे सर्व बंद करा."
शेफाली जरीवाला ही एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. ‘कांटा लगा’ या गाण्याने तिला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली होती. यानंतर ती ‘मुझसे शादी करोगी’ हा चित्रपट आणि अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये दिसली. ‘बिग बॉस १३’ मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री घेऊन तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तर, पराग त्यागी हा टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध अभिनेता असून, ‘पवित्र रिश्ता’ आणि ‘ब्रह्मराक्षस’ यांसारख्या मालिकांमधील भूमिकांसाठी तो ओळखला जातो.