Shah Rukh Khan King Movie: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. २०२३ मध्ये 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' यांसारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर शाहरुख खानचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. त्यामुळे त्याच्या आगामी 'किंग' चित्रपटाची चाहत्यांना मोठी उत्सुकता आहे. विशेष म्हणजे, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केल्याची चर्चा आहे.
शाहरुख खानच्या 'किंग' चित्रपटाच्या परदेशातील थिएटर प्रदर्शनाचे हक्क (ओव्हरसीज थिएट्रिकल राइट्स) तब्बल १७५ कोटी रुपयांना विकले गेल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी परदेशी हक्कांची डील असल्याचे सांगितले जात आहे.
'पिंकव्हिला'च्या वृत्तानुसार, फार्स फिल्म्स या कंपनीने 'किंग' चित्रपटाचे परदेशातील वितरण हक्क १७५ कोटी रुपये म्हणजेच १८ दशलक्ष डॉलरपेक्षा अधिक किमतीत मिळवले आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वी शाहरुख खानच्या चित्रपटांचे परदेशातील वितरण प्रामुख्याने यशराज फिल्म्सकडून केले जात होते.
२०२३ मध्ये यशराज फिल्म्सने शाहरुखच्या 'पठाण' आणि 'जवान' या चित्रपटांचे वितरण केले होते. या दोन्ही चित्रपटांना देशासह परदेशातही मोठे यश मिळाले होते. दुसरीकडे, फार्स फिल्म्सलाही आंतरराष्ट्रीय चित्रपट वितरणाचा चांगला अनुभव आहे. या कंपनीने यशराज फिल्म्ससोबत अनेक चित्रपटांसाठी काम केले आहे. तसेच प्रभासच्या 'साहो' चित्रपटाचे वितरणही केले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, फार्स फिल्म्सने 'किंग'च्या परदेशातील वितरण हक्कांसाठी १७५ कोटी रुपयांची किमान हमी रक्कम (मिनिमम गॅरंटी) दिली आहे. आतापर्यंत कोणत्याही भारतीय चित्रपटाने परदेशातील हक्कांसाठी १०० कोटी रुपयांचा आकडाही ओलांडला नव्हता. त्यामुळे 'किंग'ची ही डील महत्त्वाची मानली जात आहे.
'किंग'च्या हक्कांसाठी एवढी मोठी रक्कम मोजण्यात आल्यामुळे आता या चित्रपटाच्या कमाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वितरकाने दिलेली मिनिमम गॅरंटी म्हणजे चित्रपटाच्या यशावर दाखवलेला मोठा विश्वास. मात्र, ही गुंतवणूक वसूल करण्यासाठी चित्रपटाला परदेशातही मोठी कमाई करावी लागणार आहे.
साधारणपणे परदेशातील चित्रपटगृहांमधून मिळणाऱ्या एकूण कमाईपैकी सुमारे ५० टक्के हिस्सा वितरकाला मिळतो. त्यामुळे १७५ कोटी रुपयांची गुंतवणूक वसूल करण्यासाठी 'किंग'ला परदेशात अंदाजे ३५० ते ३७५ कोटी रुपयांची कमाई करावी लागू शकते.
विशेष म्हणजे, शाहरुख खानच्या 'पठाण' आणि 'जवान' या दोन्ही चित्रपटांनी परदेशात प्रत्येकी सुमारे ४०० कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे 'किंग'कडूनही अशाच मोठ्या कामगिरीची अपेक्षा केली जात आहे.
परदेशातील कमाईच्या बाबतीत 'आरआरआर' आणि 'धुरंधर २' यांसारख्या मोठ्या चित्रपटांशी तुलना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 'किंग'समोर मोठे आव्हान असणार आहे. शाहरुख खानची लोकप्रियता आणि सिद्धार्थ आनंद यांचे दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट परदेशातील बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शाहरुख खानचा 'किंग' हा बहुप्रतीक्षित चित्रपट २४ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. यापूर्वी शाहरुख आणि सिद्धार्थ आनंद यांनी 'पठाण' या चित्रपटासाठी एकत्र काम केले होते. आता ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटात शाहरुख खानसोबत त्याची मुलगी सुहाना खान, दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी, जयदीप अहलावत, राघव जुयाल आणि सौरभ शुक्ला यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
एकीकडे चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहत्यांना प्रतीक्षा आहे, तर दुसरीकडे रिलीजपूर्वीच झालेल्या १७५ कोटींच्या परदेशी हक्कांच्या व्यवहारामुळे 'किंग'ची चर्चा रंगली आहे. आता शाहरुख खानचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.