मुंबई - शुक्रवारी जाहीर झालेल्या 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये हिंदी सुपरस्टार शाहरुख खानने ‘जवान’साठी त्याच्या कारकिर्दीतील पहिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला. 'जवान'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाल्यानंतर सुपरस्टार शाहरुख खानने व्हिडिओ पोस्ट करून भावना व्यक्त केल्या. शाहरुखला ३३ वर्षांनंतर त्याच्या करिअरमधील पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला आहे.
शाहरुखने सरकार, ज्युरी आणि आपल्या अगणित फॅन्सचे आभार मानले आहेत. हा पुरस्कार त्याला २०२३ मध्ये रिलीज झालेल्या जवान चित्रपटासाठी घोषित करण्यात आला आहे. ज्याचे दिग्दर्शन एटली केले होते. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, किंग खानच्या हाताला दुखापत झाली आहे.
"...मी कृतज्ञता, अभिमान आणि नम्रतेने भारावून गेलो आहे हे वेगळे सांगायला नको...हा पुरस्कार मला आठवण करून देतो की अभिनय हा केवळ एक व्यवसाय नाही तर पडद्यावर सत्य मांडण्याची जबाबदारी आहे. मी सर्वांच्या प्रेमाबद्दल आभारी आहे.."
चित्रपट निर्माते आणि परीक्षक मंडळाचे अध्यक्ष आशुतोष गोवारीकर यांनी 2023 सालासाठीच्या या पुरस्कारांची घोषणा केली. बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जीला ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला. हा तिचाही पहिलाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहे.
‘जवान’मधील दुहेरी भूमिकेसाठी शाहरुखला हा सन्मान मिळाला. आशुतोष गोवारीकर म्हणाले, शाहरुखने एक दमदार आणि ऊर्जावान अभिनय सादर केला, ज्यामध्ये त्याने तीव्र भावना आणि भावनिक खोली यांचा समतोल साधला. त्याने केवळ शत्रूंशीच नव्हे, तर सामाजिक सीमांशीही लढणार्या नायकाच्या दोन अविस्मरणीय व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत केल्या.
पुरस्कार मिळाल्यानंतर राणी मुखर्जी म्हणाली, मी ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’मधील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने भारावून गेले आहे. माझ्यासाठी हा पुरस्कार माझ्या 30 वर्षांच्या कारकिर्दीला, माझ्या कलेप्रती असलेल्या समर्पणाला आणि चित्रपटसृष्टीवरील माझ्या प्रेमाला मिळालेली एक मोठी पोचपावती आहे.
विक्रांत मेस्सीनेही याला स्वप्नवत क्षण म्हटले. तो म्हणाला, माझा पहिला राष्ट्रीय पुरस्कार शाहरुख खानसारख्या आयकॉनसोबत मिळवणे हा एक मोठा सन्मान आहे.
शाहरुखला हा पुरस्कार ‘12वी फेल’ चित्रपटासाठी विक्रांत मेस्सीसोबत विभागून देण्यात आला. विशेष म्हणजे, ‘12वी फेल’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान मिळाला. तर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून ‘श्यामची आई’ तर सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा मान ‘नाळ-2’ला मिळाला.