Samay Raina Announces India’s Got Latent S2: स्टँड-अप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तब्बल १४ महिन्यांनंतर त्याचा वादग्रस्त लोकप्रिय शो India’s Got Latent सीझन २ परत येणार असल्याची घोषणा त्याने केली आहे.
फेब्रुवारी २०२५ मध्ये या शोमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. पॅनेलमध्ये सहभागी असलेल्या रणवीर अलाहाबादिया आणि आशिष चंचलानी यांच्यावर अश्लील आणि आक्षेपार्ह विनोदांमुळे अनेक FIR दाखल करण्यात आले होते. या प्रकरणानंतर सायबर सेलची चौकशी, सार्वजनिक माफी आणि शेवटी रैनाने स्वतःच सर्व एपिसोड YouTube वरून हटवले होते.
या सगळ्या वादानंतर रैना काही काळ शांत राहिला. मात्र ७ एप्रिल रोजी त्याने आपल्या YouTube चॅनलवर ‘Still Alive’ हा स्पेशल शो रिलीज केला आणि त्यातूनच त्याने मोठी घोषणा केली. शोच्या शेवटी त्याने स्पष्ट केलं की, “India’s Got Latent परत आणणारच… कारण मला तो शो करायला खूप मजा यायची.”
रैनाने यावेळी शोच्या फॉरमॅटबाबतही संकेत दिले. तो म्हणाला की, पुढचा शो अधिक ‘वाइल्ड’ असेल. प्रत्यक्ष शोमध्ये अधिक मोकळा कंटेंट असेल, पण इंटरनेटवर त्याचं ‘सॉफ्ट’ व्हर्जन अपलोड केलं जाईल. म्हणजे, तो पुन्हा नवीन शो घेऊन येण्याच्या तयारीत आहे.
या शोमध्ये रैनाने मागील वादावरही भाष्य केलं. त्याने सांगितलं की हा सगळा प्रकार त्याच्यासाठी मानसिकदृष्ट्या खूप कठीण होता. वाद वाढल्यानंतर तो प्रचंड तणावात होता, इतकंच नव्हे तर झोपण्यासाठी त्याने मेलाटोनिनच्या अनेक गोळ्या घेतल्याचाही खुलासा केला.
रैनाने समाजातील ‘इमेज’च्या संकल्पनेवरही भाष्य केलं. त्याच्या मते, ज्यांची प्रतिमा ‘चांगली’ असते त्यांच्याकडून एखादी चूक झाली तर लोक त्यांना जास्त जज करतात, पण ज्यांची प्रतिमा आधीपासूनच ‘बोल्ड’ असते, त्यांच्याकडे तितकं लक्ष दिलं जात नाही. त्याने रणवीर अलाहाबादियाच्या उदाहरणावरून ही बाब स्पष्ट केली.
त्याच्या बोलण्यात वैयक्तिक वेदनाही स्पष्ट दिसून आल्या. त्याने सांगितलं की या वादाचा परिणाम फक्त त्याच्यावरच नाही, तर त्याच्या कुटुंबावरही झाला. विशेषतः त्याच्या आई-वडिलांवर झालेल्या टीकेने तो भावूक झाला होता.
याशिवाय, रैनाने आपल्या काश्मिरी ओळखीवरही विनोद करत समाजातील वास्तवावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. त्याच्या मते, कधी कधी लोक चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी अडकतात आणि त्याचा फटका त्यांना बसतो.
या शोमध्ये त्याने काही टीकाकारांनाही उत्तर दिलं. राजकारणी, सेलिब्रिटी आणि इतर कॉमेडियन्स यांनी केलेल्या टीकेवर त्याने आपली भूमिका मांडली. काहींवर त्याने थेट टोमणेही मारले.