मुंबई - बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान नेहमी आपल्या मदतीच्या वृत्तीमुळे चर्चेत राहतो. गरजूंसाठी धावून जाणारा हा अभिनेता यावेळी पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी देवदूत ठरला आहे. राज्यातील अनेक भाग सध्या पुराच्या पाण्यात बुडाले असून हजारो लोक बेघर झाले आहेत. या कठीण परिस्थितीत सलमान खानने मदतीचा हात पुढे करत पाच नौका पंजाबला पाठवल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय, हुसैनीवाला भागाशी लागून असलेल्या अनेक गावांना तो दत्तक घेणार असल्याचेही कळते.
दरम्यान, सोनू सूद देखील तेथील दौरा करण्यासाठी पोहोचला असून त्याने सोशल मीडियावर फोटोज शेअर केले आहेत.
रिपोर्टनुसार, पंजाब टुरिझमच्या चेअरमॅनने पूरग्रस्त फिरोजपूर गावाचा दौरा केला आणि सलमान खानच्या एनजीओकडून पाठवण्यात आलेल्या ५ नौका प्रशासनाकडे सुपूर्द केल्या. दोन नौका फिरोजपूर बॉर्डरवर जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आल्या. तर अन्य तीन नौका संपूर्ण राज्यात रेस्क्यू ऑपरेशनमध्ये वापरण्यात येईल.
रिपोर्टनुसार, पूरस्थिती नियंत्रणात आल्यानंतर सलमान खानचे फौंडेशन 'बीईंग ह्यूमन' हुसैनीवाला भागाशी लागून असलेले अनेक गावे दत्तक घेऊन त्यांचे पुनर्विकास करण्यासाठी प्रयत्न करेल.
सोनू सूदने पंजाबच्या पूरग्रस्त भागाचा दौरा केला आणि फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, 'पंजाब सोबत, नेहमीसाठी. आम्ही जमीनीवर होतो. आम्ही नुकसान पाहिलं, मन तुटले आणि ती शक्ती आजदेखील थांबण्याचे नाव घेत नाही. गावे पाण्यात बुडाली, आयुष्य उद्ध्वस्त झाले, पण इच्छा अद्याप कायम आहे. पंजाबला जे काही हवं आहे, आम्ही इथे आहोत...मदत करण्यासाठी. पुनर्निर्माण साठी...जखमा भरण्यासाठी...सोबत मिळून.'
पूरग्रस्त पंजाबसाठी अक्षय कुमार ५ कोटींची मदतीची घोषणा केली आहे. तो म्हणाला की, ही रक्कम मदत साहित्य खरेदी करण्यासाठी देण्यात आली आहे. अक्षय व्यतिरिक्त रणदीप हुड्डासारखे स्टार देखील पुढे आले आहेत.