Sachin Pilgaonkar on Urdu Language
मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सचिन पिळगावकर नेहमीच त्यांच्या बहुगुणी व्यक्तिमत्वामुळे चर्चेत असतात. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्यांनी उर्दू भाषेबद्दलचं आपलं प्रेम व्यक्त करताना केलेलं विधान सोशल मीडियावर चांगलंच चर्चेचा विषय बनला आहे.
सचिन पिळगावकर हे त्यांच्या स्पष्ट आणि विचारपूर्ण वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत राहतात. त्यांच्या मतांवरून त्यांना कधी कौतुक तर कधी ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागतं. नुकतेच ते ‘बहार-ए-उर्दू’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या विशेष सोहळ्यात सचिन पिळगावकर यांच्यासोबत अभिनेते शेखर सुमन आणि इतर मान्यवरही उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान बोलताना सचिन यांनी आपल्या भाषेवरील प्रेम व्यक्त केलं. ते म्हणाले - “माझी मातृभाषा मराठी असली तरी मी विचार उर्दूत करतो.” त्यांच्या या मनमोकळ्या कबुलीने उपस्थित प्रेक्षकांना भारावून टाकलं. पण दुसरीकडे मात्र सोशल मीडियावर त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली.
सचिन पिळगावकर म्हणाले- ''माझी मातृभाषा मराठी आहे पण मी विचार उर्दू भाषेतून करतो. मला माझ्या बायकोने किंवा कोणीही रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलून जागा होतो. मी केवळ उर्दूतून जागा होत नाही तर मी उर्दूसोबत झोपतोही. माझं उर्दू भाषेवरील प्रेम माझ्या बायकोला आवडतं.'' त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांनी दाद दिली. पण शेखर सुमन यांनीही खास दाद दिली.
सचिन पिळगावकर यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटांत काम केलं आहे. चित्रपटसृष्टीतला बालकलाकार पासून सुरू झालेला त्यांचा प्रवास अद्यापही कायम आहे. अभिनय, संवादफेक आणि भाषेवरील पकड ही नेहमीच प्रेक्षकांना रुंजी घालणारी ठरलीय. त्यामुळेच उर्दू भाषेवरील त्यांचं प्रेम त्यांनी प्रांजळपणे व्यक्त केलं आहे.
सचिन हे रणांगण, कट्यार काळजात घुसली, अशी ही आशिकी, अरे देवा, आयत्या घरात घरोबा, गंमत जंमत, अशीही बनवाबनवी, नवरा माझा नवसाचा २, सिटी ऑफ ड्रीम्स अशा असंख्य चित्रपटामध्ये दिसले होते. त्यांनी शोले, सत्ते पे सत्ता, बालिका वधू, नदिया के पार, अवतार अशा हिंदी चित्रपटांमधूनही आपली प्रतिमा सोडलीय.
उर्दू भाषेचे गोडवे गायले, त्यामुळे अनेकांना त्यांचे हे वक्तव्य पचलेलं नाही. काही नेटकऱ्यांनी त्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका सोशल मीडिया युजरने म्हटलं की, मराठीत असे कलाकार असतील तर काय उपयोग? मराठी चित्रपटसृष्टीचे हे हाल आहेत. तर आणखी एकाने लिहिले- तुमच्या काही लक्षात राहत नाहीये का? तुम्ही खरंच म्हातारे झाले का? तर दुसऱ्या नेटकऱ्याने त्यांना त्यांचे बोलणे कुणीतरी आवरा, असे म्हटले आहे. काही नेटकऱ्यांना त्यांचे हे विधान फारसं पसंत पडलेलं दिसत नाही.