Kantara Chapter- 1 Trailer released today  x account
मनोरंजन

Kantara Chapter- 1 Trailer | आला धमाकेदार ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चॅप्टर-१' चा ट्रेलर! लोककथा अन् दैवी शक्तींचा संगम पाहून भारावले फॅन्स

Rishabh Shetty Kantara Chapter- 1 Trailer |२५ एकरच्या खडतर भूप्रदेशात शूट करण्यात आला वॉर सीक्वेन्स

स्वालिया न. शिकलगार

Kantara Chapter- 1 Trailer out now

मुंबई - 'कांतारा'च्या मूळच्या चित्रपटाने सर्व सिनेरसिकांना वेड लावलं होतं. आता कांतारा चॅप्टर १ येतोय, ज्यामध्ये मुळच्या कहाणीची आधीची कथा दाखवण्यात येईल. आज १२:४५ ला कांतारा चॅप्टर १ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. दिग्दर्शक व अभिनेता ऋषभ शेट्टी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर नवा अनुभव घेऊन आले आहेत.

‘कांतारा’ या चित्रपटाची जादू अजूनही प्रेक्षकांच्या मनातून उतरलेली नाही. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी यश मिळवले होते.

ट्रेलरमध्ये निर्मात्यांनी फारसे तपशील उघड न करता, एक गूढतेचा माहोल तयार केला आहे. या प्रीक्वलमधील रहस्यच अनेक प्रश्न निर्माण करझारे आहेत. चित्रपटाचे कथानक इतके सुंदर आहे की, यामध्ये नेमकं काय घडणार आहे, असा आपसूक प्रश्न मनात येऊन जातो.

२५ एकरच्या खडतर भूप्रदेशात शूट करण्यात आला वॉर सीक्वेन्स

'कांतारा: चॅप्टर १' ही होम्बळे फिल्म्सची आतापर्यंतची सर्वात महत्त्वाकांक्षी आणि मोठी प्रकल्पांपैकी एक मानली जात आहे. संगीत दिग्दर्शक बी. अजनीश लोकनाथ, सिनेमॅटोग्राफर अरविंद कश्यप आणि प्रॉडक्शन डिझायनर विनेश बंग्लान आहेत. याशिवाय, होम्बळे फिल्म्सने 'कांतारा: चॅप्टर १' साठी त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या मदतीने एक वॉर सीक्वेन्स तयार केला आहे. या सीक्वेन्समध्ये ५०० हून अधिक स्किल्ड फायटर्स आणि तीन हजार लोकांचा समावेश आहे. हा सीन २५ एकरच्या खडतर भूप्रदेशात, तब्बल ४५-५० दिवसांच्या शूटिंगनंतर चित्रित करण्यात आला आहे.

जंगल, परंपरा, दैव-दैवतांचा संघर्ष, श्रद्धा आणि लोककथा या सगळ्यांचा मिलाफ प्रेक्षकांना या ट्रेलरमध्ये दिसतो आहे. ऋषभ शेट्टीचा दमदार अभिनय, त्याचे शानदार डायलॉग्ज, भव्य दिग्दर्शन ट्रेलरमध्ये दिसून येतो. विशेष म्हणजे हा चित्रपट ‘कांतारा’चा प्रीक्वेल असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. म्हणजेच प्रेक्षकांना पहिल्या भागाआधीची कहाणी जाणून घेता येणार आहे. त्यामुळे फॅन्सची उत्सुकता शिगेला आहे.

ट्विटमध्ये काय म्हटलं होतं?

होम्बले फिल्मने एक्स अकाऊंटवर ट्विट केले होते. निर्मात्यांनी १९ सप्टेंबर रोजी अधिकृत सोशल मीडिया पोस्टद्वारे लाँच वेळेची घोषणा केली होती. ट्विटमध्ये म्हटलंय-''कांतारा अध्याय १ च्या जगात एक झलक पहा आणि एका आख्यायिकेच्या उदयाचे साक्षीदार व्हा. कांतारा चॅप्टर १ चा ट्रेलर आज दुपारी १२:४५ वाजता प्रदर्शित होईल. २ ऑक्टोबर २०२५ पासून जगभरातील थिएटरमध्ये दिव्य देखावा पहा.''

केव्हा रिलीज होणारा कांतारा चॅप्टर-१

ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर #KantaraChapter1 हा हॅशटॅग ट्रेंडिंगला गेला आहे. होम्बले फिल्म्स अंतर्गत विजय किरागंडूर निर्मित, हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. कन्नडसह हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मलयाळममध्ये हा चित्रपट रिलीज होणार असल्याची माहितीही समोर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT