Ranbir Kapoor’s Ramayana Pudhari
मनोरंजन

Ramayana Movie: ‘रामायण’च्या भव्य प्रदर्शनाची तयारी; रणबीर कपूर आणि यशचा चित्रपट 'या' दिवशी राष्ट्रपती भवनात दाखवणार

Ramayana Movie: रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘रामायण’ चित्रपटाच्या ५ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती भवनात विशेष स्क्रीनिंगची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे.

Rahul Shelke

Ranbir Kapoor’s Ramayana: Special Screening and Release Date:

अभिनेता रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘रामायण : राइज ऑफ अ लेजेंड’ या बहुचर्चित चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगची चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटाचे स्क्रीनिंग ५ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात आयोजित करण्याची तयारी सुरू असल्याचे वृत्त समोर आले आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र, या विशेष स्क्रीनिंगला अद्याप अधिकृत मंजुरी मिळालेली नाही.

‘मिड-डे’च्या वृत्तानुसार, चित्रपटाच्या निर्मात्यांकडून या कार्यक्रमासाठी आवश्यक परवानग्या मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व परवानग्या मिळाल्यास या स्क्रीनिंगला राजकीय नेते आणि काही खास मान्यवर उपस्थित राहू शकतात. रणबीर कपूर, साई पल्लवी, यश आणि चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्याही उपस्थितीची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई आणि दिल्लीत प्रीमियरचे नियोजन

‘रामायण’च्या प्रदर्शनापूर्वी दोन विशेष प्रीमियर आयोजित करण्याचीही निर्मात्यांची योजना असल्याचे वृत्त आहे. यापैकी एक प्रीमियर मुंबईत, तर दुसरा दिल्लीमध्ये मान्यवरांसाठी आयोजित केला जाण्याची शक्यता आहे. मात्र, या कार्यक्रमांबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढत असतानाच निर्मात्यांनी चित्रपटाचे नवे प्रमोशनल व्हिडीओ आणि पोस्टर्स प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या व्हिडीओमध्ये चित्रपटाचे शीर्षक आणि भव्य अ‍ॅक्शन दृश्यांची झलक पाहायला मिळते. हा चित्रपट 3D तंत्रज्ञानासह IMAX आणि मोठ्या पडद्याच्या प्रीमियम स्वरूपात प्रदर्शित करण्याची योजना आहे.

अनुपम खेर साकारणार जटायूची भूमिका

चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकतेच जटायू या महत्त्वाच्या पात्राचे पोस्टरही प्रसिद्ध केले आहे. या पात्राला अभिनेते अनुपम खेर यांनी आवाज दिला आहे. पोस्टरसोबत शेअर केलेल्या मेसेजमध्ये जटायूच्या धैर्याचा आणि धर्मासाठी केलेल्या संघर्षाचा उल्लेख करण्यात आला आहे.

रामायणाच्या कथेत रावण सीतेचे अपहरण करून तिला लंकेकडे घेऊन जात असताना जटायू त्याला रोखण्याचा प्रयत्न करतो. रावणाची ताकद माहीत असूनही जटायू सीतेच्या मदतीसाठी त्याच्याशी लढतो. त्यामुळे रामायणाच्या कथेत जटायूचे पात्र महत्त्वाचे आहे.

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सध्या वेगवेगळ्या पात्रांची पोस्टर्स प्रसिद्ध केली जात आहेत. जटायूच्या पोस्टरमुळे या चित्रपटातील व्यक्तिरेखांबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

रणबीर रामाच्या भूमिकेत, तर यश साकारणार रावण

दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या या भव्य चित्रपटात रणबीर कपूर भगवान श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे. साई पल्लवी सीतेची, तर यश रावणाची भूमिका साकारणार आहेत. याशिवाय सनी देओल हनुमानाच्या आणि रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसतील. अनुपम खेर यांनी जटायूला आवाज दिला आहे.

दोन भागांत प्रदर्शित होणार ‘रामायण’

‘रामायण’ हा चित्रपट दोन भागांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिला भाग ५ नोव्हेंबर रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्याचे नियोजन आहे. दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे.

हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. भव्य दृश्ये, मोठी स्टारकास्ट आणि भारतीय महाकाव्यावर आधारित कथा यामुळे या चित्रपटाकडे संपूर्ण चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.

मात्र, राष्ट्रपती भवनातील विशेष स्क्रीनिंगबाबतची अधिकृत घोषणा आणि आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतरच या कार्यक्रमाचे चित्र स्पष्ट होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT