Ramayana Muslim Artists Pudhari
मनोरंजन

Ramayana Film Artists: 3. ‘रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये किती मुस्लिम कलाकारांनी केलं काम? अभिनयापासून संगीतापर्यंत महत्त्वाची जबाबदारी

Ramayana Muslim Artists: रणबीर कपूरच्या बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटात अभिनयापासून संगीत आणि एडिटिंगपर्यंत अनेक मुस्लिम कलाकारांनी योगदान दिले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Ramayana Muslim Artists: नितेश तिवारी दिग्दर्शित आणि नमित मल्होत्रा निर्मित बहुप्रतीक्षित ‘रामायण’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. रणबीर कपूर, यश, साई पल्लवी आणि सनी देओल यांसारख्या मोठ्या कलाकारांमुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. चित्रपटातील भव्य दृश्ये, कलाकारांची निवड आणि संगीत याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र, या चित्रपटाच्या निमित्ताने आणखी एका गोष्टीची चर्चा सुरू झाली आहे. ती म्हणजे, ‘रामायण’ या चित्रपटाच्या निर्मितीत किती मुस्लिम कलाकारांनी काम केले आहे?

चित्रपटातील प्रमुख भूमिका साकारणाऱ्या कलाकारांमध्ये रणबीर कपूर, यश, साई पल्लवी, रवि दुबे, सनी देओल, अरुण गोविल आणि अनुपम खेर यांचा समावेश आहे. मात्र, अभिनयासोबतच संगीत आणि तांत्रिक विभागातही अनेक कलाकारांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे. यामध्ये सहा मुस्लिम कलाकारांची नावे विशेष चर्चेत आहेत.

कुंभकर्णाच्या भूमिकेत फैसल मलिक

‘रामायण’मध्ये रावणाचा भाऊ कुंभकर्ण याची महत्त्वाची भूमिका अभिनेता फैसल मलिक याने साकारली आहे. ‘पंचायत’ या लोकप्रिय वेबसीरिजमधून फैसल मलिक घराघरांत पोहोचला आहे.

याशिवाय अभिनेत्री छाया अली खान यांनी राणी सुनयना यांची भूमिका साकारली आहे. राणी सुनयना या माता सीतेच्या आई आणि राजा जनक यांच्या पत्नी आहेत. तसेच अभिनेता जहांगीर खान याने लंकेतील प्रमुख योद्ध्यांपैकी एक असलेल्या दूषण या राक्षसाची भूमिका साकारली आहे.

ए.आर. रहमान आणि मुलगा ए.आर. अमीन यांचे संगीत

चित्रपटाच्या संगीत विभागातही दोन महत्त्वाची नावे आहेत. ती म्हणजे ऑस्कर विजेते संगीतकार ए.आर. रहमान आणि त्यांचा मुलगा ए.आर. अमीन.

ए.आर. रहमान यांनी प्रसिद्ध संगीतकार हान्स झिमर यांच्यासोबत मिळून ‘रामायण’ चित्रपटाचे संगीत तयार केले आहे. चित्रपटातील संगीताला विशेष महत्त्व असून, ‘हनुमान चालीसा’, ‘राइज ऑफ असुर’, ‘जुडी जोडी’ आणि ‘सीताज एस्पिरेशन’ यांसारख्या गाण्यांमध्ये त्यांचे योगदान आहे.

विशेष म्हणजे, ए.आर. रहमान यांचे पुत्र आणि गायक ए.आर. अमीन यांनीही या चित्रपटासाठी गाणे गायले आहे. रक्षिता सुरेश, वैशाली सामंत आणि अंतरा नंदी या गायकांनीही चित्रपटासाठी गाणे गायले आहे.

एडिटिंगची महत्त्वाची जबाबदारी हुजेफा लोखंडवाला यांच्याकडे

चित्रपटाच्या पडद्यामागील तांत्रिक टीममध्येही मुस्लिम कलाकाराचा महत्त्वाचा सहभाग आहे. हुजेफा लोखंडवाला यांनी चित्रपटाच्या एडिटिंगची म्हणजेच संपादनाची जबाबदारी सांभाळली आहे. चित्रपटातील दृश्ये योग्य पद्धतीने जोडणे, कथेला प्रभावी स्वरूप देणे आणि चित्रपटाचा वेग कायम ठेवणे यामध्ये एडिटरची भूमिका महत्त्वाची असते.

अभिनयापासून संगीतापर्यंत महत्त्वाचे योगदान

‘रामायण’ चित्रपटाच्या निर्मितीत अभिनय, संगीत आणि तांत्रिक विभाग अशा विविध क्षेत्रांत या सहा मुस्लिम व्यक्तींनी योगदान दिले आहे. ए.आर. रहमान, ए.आर. अमीन, फैसल मलिक, छाया अली खान, जहांगीर खान आणि हुजेफा लोखंडवाला या नावांची चित्रपटाच्या निमित्ताने चर्चा होत आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीत एखादा मोठा चित्रपट साकारताना पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांसोबतच पडद्यामागील अनेक व्यक्तींचे योगदानही तितकेच महत्त्वाचे असते, हे या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT