प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी रणवीर सिंहच्या 'धुरंधर २' बद्दल एक वादग्रस्त ट्विट केले आहे. या चित्रपटाची भव्यता पाहून त्याने धुरंधर-२ ला 'शोले' पेक्षा १०० पटीने सरस आणि 'मुघल-ए-आझम' पेक्षाही भव्य म्हटले आहे. मात्र, भारतीय सिनेमाचे हे क्लासिक चित्रपटांशी एका नवीन चित्रपटाची तुलना करणे चाहत्यांना रुचले नाही. नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
ram gopal varma statement on dhurandhar-2 first review
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (RGV) आणि वाद यांचे जुने नाते आहे. कधी राजकीय विधाने तर कधी चित्रपटसृष्टीतील कलाकारांवर केलेली टीका, यामुळे तो नेहमीच चर्चेत असतो. मात्र, यावेळी त्यांनी रणवीर सिंह स्टारर 'धुरंधर २' (Dhurandhar 2) चे कौतुक करताना थेट भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या क्लासिक्स चित्रपटांबाबत बोलल्याने तो ट्रोल झाला आहे. त्याच्या एका ट्विटमुळे आता सोशल मीडियावर नव्या चर्चेला उधाण आले आहे.
राम गोपाल वर्मा (RGV) त्यांच्या बेधडक विधानांसाठी ओळखला जातो. पण 'धुरंधर २' बाबत त्याने केलेल्या विधानामुळे सोशल मीडियावर नवा वाद पेटला आहे. भारतीय सिनेसृष्टीतील 'शोले' आणि 'मुघल-ए-आझम' सारख्या अजरामर चित्रपटांशी तुलना केल्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच धारेवर धरले आहे.
रणवीर सिंहचा आगामी चित्रपट 'धुरंधर २'च्या पेड प्रिव्यू आधी राम गोपाल वर्माने चित्रपटाचा फर्स्ट रिव्ह्यू दिला. एक्स अकाऊंटवर ट्विटमध्ये लिहिलं की, ''काल रात्री #Dhurandhar2 पाहिल्यानंतर, त्याच्या एकत्रित प्रभावाचा विचार करता-मग तो चित्रपटाचे अपेक्षित उत्पन्न असो, प्रेक्षकांचा उत्साह असो, सामाजिक प्रभाव असो, cinematic grammar आव्हान असो, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचा audio-visual प्रभाव असो-या चित्रपटाची भव्यता 'शोले' (Sholay) पेक्षा १०० पटीने अधिक असेल. इतकेच नव्हे, तर 'मुघल-ए-आझम'पासून आजवर निर्माण झालेले सर्व महान चित्रपट यापुढे केवळ 'टीव्ही मालिकां'सारखे भासतील.''
''ही एका 'नव्या सिने-व्यवस्थे'ची नांदी आहे...'दिग्दर्शक' (Director) या शब्दाचे स्पेलिंगच आता @adityadharfilmsयांच्या नावाने सुरू होईल; आणि खुद्द स्टीव्हन स्पीलबर्ग व ख्रिस्तोफर नोलन यांनीही आपली सर्व कामे बाजूला सारून, #Dhurandhar2 चा 'पहिला दिवस, पहिला शो' (First Day First Show) पाहणेच अधिक..विवेकपूर्ण ठरेल.''
आदित्य धर यांच्या 'धुरंधर २' चे पेड प्रिव्ह्यू शोज १८ मार्च, २०२६ रोजी सायंकाळी ४:४५ - ५ वाजल्यापासून सुरू होत आहे. चित्रपट पडद्यावर येण्यासाठी एक दिवस बाकी असताना राम गोपाल वर्माचे स्टेटमेंट व्हायरल होत आहेत. चित्रपटाचा फर्स्ट रिव्ह्यू सोशल मीडिया एक्सवर ट्विट केले आहे. त्यांनी 'धुरंधर२' ला अमिताभ बच्चन यांच्या 'शोले'पेक्षा १०० पटींनी अधिक शानदार म्हटलं. त्यामुळे तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला. राम गोपाल वर्मा म्हणाला की, त्याने मंगळवारी रात्रीच चित्रपट पाहिला.