मुख्‍यमंत्री विजय यांच्‍या यशाबाबत दाक्षिणात्‍य रजनीकांत सुपरस्‍टार यांनी आपली भूमिका स्‍पष्‍ट केली आहे.  Pudhari
मनोरंजन

Rajinikanth on CM Vijay |"मी इतक्‍या खालच्या पातळीचा माणूस नाही": CM विजय यांच्याबद्दल सुपरस्‍टार रजनीकांत नेमकं काय म्‍हणाले?

राजकीय वर्तुळात सुरु असणार्‍या चर्चेला पूर्णविराम देण्‍यासाठी घेतली पत्रकार परिषद

पुढारी वृत्तसेवा

Rajinikanth on CM Vijay

चेन्‍नई : नुकत्‍याच झालेल्‍या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभिनेते विजय यांच्या 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) पक्षाने ऐतिहासिक यश मिळवले. मित्रपक्षांच्या पाठिंब्याने त्‍यांनी सरकारही स्थापन केले. आगामी काळात तामिळनाडूतील द्रविडी राजकारणाला नवी दिशा देणाऱ्या या घडामोडींनंतर दाक्षिणात्‍य सुपरस्टार रजनीकांत यांनी मुख्‍यमंत्री विजय यांच्‍याबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे.

रजनीकांत यांनी घेतली होती द्रमुक प्रमुख स्‍टॅलिन यांची भेट

निवडणुकीतील पराभवानंतर रजनीकांत यांनी द्रमुक (DMK) प्रमुख एम. के. स्टॅलिन यांची भेट घेतली होती. या भेटीवरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू होत्या. विजय तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री झाल्यामुळे रजनीकांत नाराज आहेत, असा अर्थ या भेटीचा काढला जात होता. या सर्व चर्चांना आज (दि. १७) रजनीकांत यांनी पूर्णविराम दिला. "मी माजी मुख्यमंत्र्यांची (स्टॅलिन) केवळ एक मित्र म्हणून भेट घेतली होती, पण विजय मुख्यमंत्री झाल्याबद्दल मी नाराज असल्याचा चुकीचा अर्थ लोकांनी काढला," असे रजनीकांत यांनी स्पष्ट केले.

मी विजयचा मत्सर का करू?

चेन्नईतील पोस गार्डन येथील आपल्या निवासस्थानी आज (दि. १७) झालेल्‍या पत्रकार परिषद बोलताना रजनीकांत म्‍हणाले की, "मी राजकारणात नाही, त्यामुळे विजय मुख्यमंत्री झाल्याचा मला अजिबात मत्सर वाटत नाही. मी विजयचा मत्सर का करू? कदाचित कमल (हासन) मुख्यमंत्री झाले असते, तर मला थोडा मत्सर वाटला असता," अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी यावेळी हसत हसत केली.

पहिल्याच निवडणुकीत विजय थेट मुख्यमंत्री झाल्‍याचे आश्‍चर्य

निवडणुकीचे निकाल समोर येऊन विजय यांचा पक्ष विजयी होताच आपण त्यांचे अभिनंदन केले होते, अशी माहिती त्यांनी दिली. मात्र, पहिल्याच निवडणुकीत विजय थेट राज्याचे मुख्यमंत्री बनतील, हे पाहून आपल्यालाही आश्चर्य वाटल्याची कबुलीही रजनीकांत यांनी दिली.

मी गप्प बसलो असतो तर लोकांनी ते खरं मानलं असतं

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्यावर बरीच टीका केली जात असल्यामुळेच आपण ही पत्रकार परिषद घेत असल्याचे रजनीकांत यांनी सांगितले. "मी जर आता यावर उत्तर दिले नसते, तर लोकांनी त्याच टीकेला सत्य मानले असते. कोणत्याही विषयावर विनाकारण बोलणारा रजनी हा इतका हलक्या किंवा खालच्या पातळीचा माणूस नाही," अशा कडक शब्दांत त्यांनी टीकाकारांना सुनावले.

स्टॅलिन यांच्‍या पराभवाने वाईट वाटलं

स्टॅलिन यांच्यासोबत असलेली त्यांची मैत्री राजकारणाच्या पलीकडची आहे. स्टॅलिन यांचा कोळथूर मतदारसंघातून पराभव झाल्याने आपल्याला वाईट वाटल्याचे त्यांनी सांगितले. या मतदारसंघातून सलग तीनदा निवडून आलेल्या स्टॅलिन यांचा 'टीव्हीके'च्या (TVK) व्ही. एस. बाबू यांनी सुमारे ९,००० मतांनी पराभव केला.

विजय यांच्‍या राजकीय यशाचे केले कौतुक

नवे मुख्यमंत्री विजय आणि आपल्यामध्ये २४ वर्षांचे अंतर असल्याचे सांगत, रजनीकांत यांनी विजय यांचे कौतुकही केले. तामिळनाडूतील द्रमुक (DMK) आणि अण्णाद्रमुक (AIADMK) या दोन बलाढ्य द्रविडी पक्षांसमोर उभे राहून विजय यांनी स्वतःची ओळख निर्माण केली, याबद्दल त्यांनी विजय यांची स्तुती केली.

आधीचे मौन आणि आताचे स्पष्टीकरण

विजय यांच्या या नेत्रदीपक राजकीय प्रवेशावर रजनीकांत यांनी घेतलेली ही भूमिका त्यांच्या आधीच्या भूमिकेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. १२ मे रोजी जेव्हा पत्रकारांनी त्यांना विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथेबद्दल विचारले होते, तेव्हा त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले होते. त्यावेळी त्यांनी फक्त हात जोडून, हसून पुढे जाणे पसंत केले होते.मात्र रजनीकांत यांनी स्‍टॅलिन यांची भेट घेतल्‍यानंतर राजकीय वर्तुळात सुरु असणार्‍या चर्चेला पूर्णविराम देण्‍यासाठी त्‍यांनी पत्रकार परिषदत घेत स्‍पष्‍टीकरण दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT