Raja Shivaji Box Office Day 4: 'राजा शिवाजी' हा रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित ऐतिहासिक चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. पहिल्या तीन दिवसांत जबरदस्त कमाई केल्यानंतर चौथ्या दिवशी, म्हणजेच सोमवारी, चित्रपटाच्या कमाईत अपेक्षेप्रमाणे घट दिसून आली.
चित्रपटाने पहिल्या दिवशी ₹11.35 कोटींची कमाई करत जोरदार सुरुवात केली. त्यानंतर शनिवारी ₹10.55 कोटी आणि रविवारी ₹12 कोटींची कमाई झाली. मात्र, आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी चित्रपटाने ₹5.6 कोटींचा गल्ला जमवला. ही घट मोठी असली तरी वीकेंडनंतर अशा प्रकारची घसरण सामान्य मानली जाते.
या चार दिवसांत ‘राजा शिवाजी’ने भारतात एकूण सुमारे ₹39.50 कोटींची नेट कमाई केली आहे, तर ग्रॉस कलेक्शन जवळपास ₹46.95 कोटींवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे, 'एक दिन' या चित्रपटाशी स्पर्धा असूनही ‘राजा शिवाजी’च्या कमाईवर त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही.
या चित्रपटात रितेश देशमुखसोबत जेनेलिया डिसूझा, अभिषेक बच्चन, संजय दत्त आणि महेश मांजरेकर यांसारख्या कलाकारांची मोठी फळी आहे. तसेच सलमान खान यांचा खास कॅमिओही प्रेक्षकांना आवडत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाला समीक्षकांकडून मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या असल्या तरी प्रेक्षकांचा प्रतिसाद मात्र चांगला आहे. रितेश देशमुख यांनी प्रेक्षकांना चित्रपटातील सीन किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर न करण्याची विनंतीही केली आहे, जेणेकरून इतर प्रेक्षकांचा अनुभव खराब होणार नाही.
दरम्यान, ‘राजा शिवाजी’ने अवघ्या चार दिवसांत मराठी चित्रपटांच्या सर्वाधिक कमाईच्या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. आता येत्या काही दिवसांत हा चित्रपट किती कमाई करतो आणि बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठीमध्ये सर्वात जास्त कमाई करणाऱ्या 10 सिनेमांची यादी
सैराट – 80.98 कोटी
बाईपण भारी देवा: 76.92 कोटी
वेड: 61.20 कोटी
नटसम्राट: 42 कोटी
कट्यार कळजात घुसली: 40 कोटी
राजा शिवाजी: 39.50 कोटी (चार दिवसांची कमाई)
पवनखिंड: 37.72 कोटी
लाई भारी: 37 कोटी
टाइमपास: 33 कोटी
क्रांतिज्योती विद्यालय मराठी मध्यम: 28 कोटी