Raja Shivaji Box Office Collection Day 8: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे आणि तो म्हणजे ‘राजा शिवाजी’. अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुखचा हा ड्रीम प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचे बॉक्स ऑफिसच्या आकडेवारीवरून स्पष्ट दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित या ऐतिहासिक चित्रपटाने प्रदर्शनाच्या अवघ्या आठ दिवसांत भारतात तब्बल ६५ कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.
चित्रपटाने दुसऱ्या शुक्रवारी म्हणजे रिलीजच्या आठव्या दिवशी ३.२० कोटी रुपयांची कमाई केली. गुरुवारी चित्रपटाने ४ कोटींची कमाई केली होती. त्यामानाने शुक्रवारी जवळपास २० टक्क्यांची घसरण झाली असली तरी चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील पकड अजूनही मजबूत असल्याचे दिसत आहे.
सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘राजा शिवाजी’ची भारतातील एकूण नेट कमाई आता ५५.८५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तर ग्रॉस कलेक्शनने ६६.२३ कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. विकेंडमध्ये चित्रपट सहजपणे ७० कोटींचा टप्पा गाठेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
विशेष म्हणजे, या चित्रपटाला मराठी प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हिंदी व्हर्जनच्या तुलनेत मराठीची कमाई सातत्याने अधिक राहिली आहे. पहिल्याच दिवशी मराठीने ८ कोटी रुपयांची कमाई करत दमदार ओपनिंग केली होती.
पहिला दिवस
हिंदी – ३.३५ कोटी
मराठी – ८ कोटी
दुसरा दिवस
हिंदी – ३.४० कोटी
मराठी – ७.१५ कोटी
तिसरा दिवस
हिंदी – ४.२५ कोटी
मराठी – ७.७५ कोटी
चौथा दिवस
हिंदी – १.३५ कोटी
मराठी – ४.२५ कोटी
पाचवा दिवस
हिंदी – १.५५ कोटी
मराठी – ३.३५ कोटी
सहावा दिवस
हिंदी – १.२५ कोटी
मराठी – ३ कोटी
सातवा दिवस
हिंदी – १.२५ कोटी
मराठी – २.७५ कोटी
आठवा दिवस
हिंदी – ०.७० कोटी
मराठी – २.५० कोटी
या चित्रपटात विद्या बालन, संजय दत्त, अभिषेक बच्चन, फरदीन खान आणि अमोल गुप्ते यांच्यासारख्या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. तसेच सलमान खानचा छोटासा कॅमिओदेखील प्रेक्षकांना विशेष भावल्याचे दिसून आले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, स्वराज्याची लढाई आणि भव्य युद्धदृश्ये यामुळे ‘राजा शिवाजी’ प्रेक्षकांना थिएटरकडे खेचत आहे. सोशल मीडियावरही चित्रपटाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.