

Raja Shivaji Box Office Collection Day 7: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख यांच्या या ऐतिहासिक अॅक्शन ड्रामा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत पहिल्याच आठवड्यात ५० कोटींचा टप्पा पार केला आहे.
महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणावर प्रमोशन करण्यात आलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित कथानक, भव्य सेट्स आणि दमदार अभिनयामुळे चित्रपटाला मोठी पसंती मिळत आहे.
चित्रपटाने पहिल्याच दिवशी ११.३५ कोटी रुपयांची कमाई करत शानदार सुरुवात केली होती. दुसऱ्या दिवशी १०.५५ कोटी, तिसऱ्या दिवशी १२ कोटींची कमाई झाली. विकेंडनंतर वीकडेजमध्ये कलेक्शनमध्ये काही प्रमाणात चढ-उतार दिसून आला असला तरी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मजबूत पकड कायम ठेवली आहे.
चौथ्या दिवशी चित्रपटाने ५.६० कोटी, पाचव्या दिवशी ४.९० कोटी, सहाव्या दिवशी ४.२५ कोटींची कमाई केली. तर सातव्या दिवशी म्हणजे गुरुवारी चित्रपटाने सुमारे ४ कोटी रुपयांचा गल्ला जमावला.
यासह ‘राजा शिवाजी’चे सात दिवसांचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन आता ५२.६० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मराठी चित्रपटासाठी ही मोठी कामगिरी मानली जात आहे.
या चित्रपटाचे अंदाजे बजेट ७५ कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे चित्रपटाने आतापर्यंत आपल्या खर्चाच्या निम्म्याहून अधिक रक्कम वसूल केली आहे. आता पूर्ण बजेट रिकव्हर करण्यासाठी चित्रपटाला आणखी सुमारे २३ कोटी रुपयांची कमाई करावी लागणार आहे.
चित्रपटाच्या कमाईचा वेग पाहता दुसऱ्या विकेंडमध्ये कलेक्शनमध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या आठवड्यात थिएटरमध्ये कोणताही मोठा हिंदी किंवा मराठी चित्रपट प्रदर्शित झालेला नसल्याने ‘राजा शिवाजी’ला बॉक्स ऑफिसवर स्पर्धा नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत चित्रपट आणखी दमदार कमाई करू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
चित्रपटात रितेश देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तसेच अनेक दिग्गज कलाकारांचाही चित्रपटात समावेश आहे. मराठी सिनेमासाठी अभिमानाची बाब ठरत असलेल्या या चित्रपटाकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून तो ७५ कोटींचा टप्पा किती वेगाने पार करतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.