Radhika Harshe On Marathi Serial Content: आपण २०२६ मध्ये जगत आहोत, तंत्रज्ञान बदलले आहे, जग पुढे गेले आहे; पण टेलिव्हिजनवरील मालिकांची कथानके अजूनही जुनाट साच्यातून बाहेर यायला तयार नाहीत. "आजच्या काळातही मालिकांमधील सासू इतकी क्रूर किंवा मागासलेली कशी असू शकते? माझी आजीसुद्धा अशी नव्हती," अशा शब्दांत ज्येष्ठ मराठी अभिनेत्री राधिका हर्षे यांनी टीव्ही इंडस्ट्रीच्या मानसिकतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
'आर पार' या युट्यूब चॅनलवरील 'वूमन की बात' या विशेष कार्यक्रमात त्यांनी ही सडेतोड मुलाखत दिली. यावेळी त्यांनी मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये महिलांचे, विशेषतः सासूंच्या पात्रांचे जे चित्रण केले जाते, त्यावर भाष्य केले.
मुलाखतीदरम्यान राधिका हर्षे यांनी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले. त्या म्हणाल्या की, जेव्हा निर्मात्यांशी किंवा लेखकांशी कथानकाबाबत चर्चा होते, तेव्हा त्यांना एकच उत्तर मिळते: "तुम्हाला माहीत नाही, ग्रामीण भागात (रिमोट एरिया) हेच चालते, त्यांना हेच पाहायला आवडते. तुम्ही फक्त मुंबईचा विचार करू नका."
यावर हर्षे यांनी प्रश्न उपस्थित केला की, जर आपण प्रेक्षकांना पुरोगामी आणि प्रगत विचार दाखवलेच नाहीत, तर समाज पुढे कसा जाणार? "आपण इव्हॉल्व्ह (Evolve) व्हायला हवे, पण आपण उलट मागे चाललो आहोत. प्रेक्षकांना काय आवडते हे गृहीत धरून आपण त्यांना तेच जुनाट विचार का पाजतोय?" असा रोकडा सवाल त्यांनी यावेळी विचारला.
मराठी मालिकांमध्ये अनेकदा महिलांना एकमेकींच्या विरोधात कट-कारस्थानं करताना दाखवले जाते. राधिका हर्षे यांच्या मते, आजच्या काळातील सासू सुशिक्षित आहे, समजूतदार आहे. पण टीव्हीवर मात्र आजही तीच 'टिपिकल' भांडखोर सासू दाखवली जाते, जी वास्तवापासून खूप लांब आहे. अभिनेत्री म्हणून काम करताना ही वैचारिक तफावत अनेकदा खटकते, अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली.
राधिका हर्षे यांची ही मुलाखत सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून, मालिकांच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.