पुढारी ऑनलाईन डेस्क : एका अनोख्या कथेवर आधारित आणि आगळंवेगळं नाव असलेला 'प्रेमप्रथा धुमशान' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातलं धुमशान घाला रे हे धमाल मालवणी गाणं लाँच करण्यात आलं आहे. २८ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
ऑक्सिजन फिल्म्स, डायनॅमिक पिक्चर्स, आरव्हीके फिल्म्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सत्या अय्यर हे चित्रपटाचे निर्माते, तर स्वरा अभिजित वारंग, रचना विज, मोहित, नमन तलवार सहनिर्माते आहेत. अभिजित वारंग यांच्या 'पिकासो' या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर एकच अभिनेता असलेला 'देजावू' हा अत्यंत प्रयोगशील चित्रपट त्यांनी केला. आता ते 'प्रेमप्रथा धुमशान' हा नवा चित्रपट घेऊन येत आहेत. 'पिकासो'प्रमाणेच 'प्रेमप्रथा धुमशान' हा चित्रपटही मालवणी बोलीभाषेतलाच आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परबसह विनायक चव्हाण, अभय खडपकर, अभय नेवगी, मिलिंद गुरव, विश्वजित पालव, विद्याधर कार्लेकर, निकिता सावंत, कल्पना बांदेकर असे दमदार कलाकार या चित्रपटात आहेत. चेतन शिंदे यांनी छायांकन, गीत संजय वारंग, आनंद लुंकड यांचे संगीत दिग्दर्शन आणि विवेक नाईक यांच्या दमदार आवाजात हे गाणे स्वरबद्ध करण्यात आले आहे.
"धुमशान घाला रे" हे मालवणी बोलीभाषेतलंच गाणं आहे. धमाल शब्द आणि ताल धरायला लावणारं संगीत या गाण्याला लाभलं आहे. मालवणी गाणी फारच मोजकी असल्यानं या नव्या धमाल गाण्याची आता त्यात भर पडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एका अत्यंत वेगळ्या प्रथेवर या चित्रपटातील कथा बेतली आहे.