महापौरांनी श्रेयवादाचे राजकारण करू नये : धीरज सूर्यवंशी | पुढारी

महापौरांनी श्रेयवादाचे राजकारण करू नये : धीरज सूर्यवंशी

सांगली : पुढारी वृत्तसेवा; विकासकामात राजकारण करायचे नाही, ही भाजपची भूमिका आहे. महापौरांनी श्रेयवादाचे राजकारण करू नये. महापौर व राष्ट्रवादी जर राजकारणच करणार असतील, तर जशास तसे वागू, असा इशारा स्थायी समितीचे सभापती धीरज सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिला. शंभर कोटी निधीचा राष्ट्रवादीचा हवेतील बार फुसका ठरला, अशी टीकाही त्यांनी केली.

सूर्यवंशी म्हणाले, महापालिकेत भाजपची सत्ता असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका क्षेत्राच्या विकासासाठी 100 कोटींच्या विशेष निधीची घोषणा केली. केवळ घोषणाच केली नाही, तर तसा शासन निर्णयही काढला. निधीही येऊ लागला. शंभर कोटीतील किती रक्कम कोणत्या सरकारच्या काळात किती आली, यापेक्षा शंभर कोटींचा शासन निर्णय फडणवीस सरकारच्या काळात झाला, हे महत्त्वाचे आहे. शासन निर्णय झाल्यानंतर तो निधी टप्प्याटप्याने येत असतो. तसा तो आला आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या सत्ताकाळात उपमुख्यमंत्र्यांनी शंभर कोटी निधीची घोषणा केली होती. पण ही घोषणा म्हणजे हवेतील फुसका बार ठरला आहे.

खाडे, गाडगीळ, इनामदार यांच्यामुळे निधी

महापौर व राष्ट्रवादीने श्रेयवादाच्या नादाला न लागता विकासास साथ द्यावी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थायी सभापती निवडीबद्दल माझा सत्कार केला व 50 कोटींचा विशेष निधी देण्याची घोषणाही केली. सर्वांना बरोबर घेऊन विकासकामे केली जाणार आहेत. कुपवाड ड्रेनेज योजनेची अंतिम मंजुरी लवकरच होईल. कुपवाड ड्रेनेज योजनेचा ठराव भाजपच्या सत्ताकाळात झाला आहे. मिरज काळीखण सुशोभीकरणासाठी पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ व शेखर इनामदार यांच्या प्रयत्नामुळे निधी मिळाला आहे, असेही धीरज सूर्यवंशी यांनी सांगितले.

Back to top button