New Marathi Movie patri sarkar first poster released  pudhari photo
मनोरंजन

New Marathi Movie|इतिहासातील क्रांतीची गाथा मोठ्या पडद्यावर; ‘पत्री सरकार १९४२’च्या पहिल्या पोस्टरची जोरदार चर्चा

Patri Sarkar 1942 First Poster - इतिहासातील क्रांतीची गाथा मोठ्या पडद्यावर; ‘पत्री सरकार १९४२’च्या पहिल्या पोस्टरची जोरदार चर्चा

पुढारी वृत्तसेवा

New Marathi Movie patri sarkar first poster

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका महत्त्वपूर्ण आणि धगधगत्या अध्यायाला रुपेरी पडद्यावर साकारण्याची तयारी पूर्ण झाली आहे. आगामी मराठी चित्रपट पत्री सरकार १९४२’चे पहिले अधिकृत पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. त्यातून चित्रपटाच्या भव्यतेची आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीची झलक पाहायला मिळत आहे.

१९४२ च्या स्वातंत्र्य आंदोलनादरम्यान क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा परिसरात उभारलेल्या प्रतिसरकारने ब्रिटिश सत्तेला मोठे आव्हान दिले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली जी. डी. लाड, नागनाथ नायकवडी यांच्यासह असंख्य क्रांतिकारकांनी अन्याय, सावकारशाही आणि इंग्रजांच्या दडपशाहीविरोधात संघर्ष उभारला. या लढ्याची दखल थेट लंडनपर्यंत घेतली गेली होती. त्याच ऐतिहासिक संघर्षाची आणि अनेक दुर्लक्षित स्वातंत्र्यसैनिकांच्या पराक्रमाची कहाणी ‘पत्री सरकार १९४२’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

चित्रपटाच्या पोस्टरमध्ये हातात बंदूक घेतलेला क्रांतिकारक, घोड्यावर स्वार योद्धा आणि ब्रिटिश सैनिकांमधील संघर्षाचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे. आगीच्या ज्वाला, धुराचे लोट आणि रणभूमीची पार्श्वभूमी यामुळे स्वातंत्र्यलढ्यातील तणावपूर्ण वातावरण दिसते.

‘भागीरथी मोशन पिक्चर’च्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती विशाल गोविंदराव जाधव यांनी केली आहे. गीत, संगीत, कथा, पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी मनीष अनसुरकर यांनी सांभाळली आहे. संकलन कर्तव्य मोकल यांनी केले असून, संदीप वाटवे, सुमेध मराठे आणि परमहंस पाठक यांनी छायांकन केले आहे. पार्श्वसंगीताची धुरा सौरभ लता शिवकुमार यांनी सांभाळली असून, विशाल जाधव, गोरख गुंजाळ, अनन्या नाईक आणि आनंद मेनन यांच्या आवाजात चित्रपटातील गाणी साकारली आहेत.

दिग्दर्शक मनीष अनसुरकर यांनी सांगितले की, ब्रिटिश राजवटीविरोधात उभ्या राहिलेल्या क्रांतीचा खरा आवेश आणि त्यामागील संघर्ष पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कार्याचा इतिहास प्रामाणिकपणे सादर करण्याची जबाबदारी मोठी होती; मात्र संपूर्ण टीमच्या सहकार्यामुळे हे आव्हान यशस्वीपणे पेलता आले. पोस्टरनंतर लवकरच टिझर आणि ट्रेलर प्रदर्शित होणार असून, त्यातून चित्रपटातील अनेक पैलू प्रेक्षकांसमोर उलगडतील, असेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT