Bollywood Stars Reaction on Operation Sindoor
नवी दिल्ली : बॉलीवूड स्टार्सनी 'जय हिंद'चे नारे देत 'ऑपरेशन सिंदूर'वर प्रतिक्रिया दिल्या आहेत. भारतीय लष्कराने पुन्हा एकदा जगासमोर दाखवून दिलंय की, जो भारतावर नजर ठेवेल, आमचे लष्कर त्याच्या घरात घुसून मारेल. ७ मे च्या रात्री दीड वाजता भारतीय लष्कर आणि एअरफोर्सने मिळून ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं आहे. पाकिस्तान आणि पीओकेमध्ये ९ दहशतवादी ठिकाणांवर एअरस्ट्राईक करून भारताने सडेतोड प्रत्युततर दिलं आहे. आता चित्रपट जगतातील कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
२२ एप्रिलला झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी हा एअरस्ट्राईक करण्यात आला. भारताने दहशतवादावर प्रहार करत त्या भ्याड हल्ल्याचा बदला घेतला आहे.
सर्वात आधी अभिनेते अनुपम खेर यांनी ऑपरेशन सिंदूर एक फोटो शेअर केला आहे. बॅकग्राऊंडमध्ये पीएम मोदी ‘भारत माता की जय’च्या घोषणा देताना दिसताहेत. अनुपम खेर यांनी देखील कॅप्शनमध्ये लिहिलंय- ‘भारत माता की जय’.
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर ‘जय हिंद’ लिहिलं आहे. तर सुपरस्टार अक्षय कुमारने इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिलं - ‘जय हिंद, जय महाकाल’.
अभिनेत्री, खासदार कंगना रनौतने भारत एअरस्ट्राईकची एक छोटी क्लिप इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केली आहे. तिने लिहिलंय - “त्यांनी म्हटलं होतं-'मोदी को बता देना' और मोदीने इन्हें बता दिया”. तिने आणखी एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये तिने भारतीय लष्कराची सुरक्षा आणि यशाची कामना केलीय. सोबतच तिने लिहिलंय - 'जो आमचे संरक्षण करतो, ईश्वर त्यांचे संरक्षण करो'.
हिना खानने ऑपरेशन सिंदूरचा फोटो लावत तिरंग्याचा इमोजी पोस्ट केला आहे.