O Romeo Movie Review Shahid Kapoor: आज शुक्रवारी 13 फेब्रुवारी रोजी O' Romeo अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि पहिल्याच शो नंतर सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली. शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरीच्या प्रमुख भूमिका असलेल्या या गँगस्टर ड्रामाने प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवलं आहे.
रिलीजपूर्वी प्री-बुकिंग फारसं जोरात नव्हतं, पण थिएटरमध्ये दाखल होताच ‘ओ’रोमियो’ने बाजी मारली. ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ पाहणाऱ्या प्रेक्षकांनी एक्स (ट्विटर)वर रिव्ह्यू शेअर करत शाहिदच्या पॉवर-पॅक्ड अभिनयाचं भरभरून कौतुक केलं आहे.
या चित्रपटात दिग्दर्शक विशाल भारद्वाज आणि शाहिद कपूर यांनी आठ वर्षांनंतर एकत्र काम केलं आहे. याआधी या जोडीने ‘हैदर’ आणि ‘रंगून’सारखे चित्रपट दिले होते, त्यामुळे ‘ओ’रोमियो’कडून आधीपासूनच मोठ्या अपेक्षा होत्या आणि त्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्याचं सध्या दिसत आहे.
एका यूजरने पहिल्या हाफचं वर्णन करत लिहिलं, “स्टायलिश अॅक्शन, झपाट्याने पुढे जाणारी स्टोरी आणि डार्क ह्युमरचा आतापर्यंतचा अनुभव खूप मजेदार आहे.” तर दुसऱ्या प्रेक्षकाने ‘ओ’रोमियो’चा फर्स्ट हाफ “थ्रिलिंग रोलरकोस्टर” असल्याचं सांगत शाहिद आणि तृप्ती दोघांच्याही अभिनयाचं कौतुक केलं आहे. अॅक्शन सीन प्रभावी असून कथानकाचा बिल्डअप मजबूत असल्याचंही अनेकांनी सांगितलं आहे.
काही प्रेक्षकांनी प्रमोशन कमकुवत असल्याचं मान्य केलं, पण चित्रपट पाहिल्यानंतर मत पूर्णपणे बदलल्याचं सांगितलं. “झिरो बज असूनही हा चित्रपट जबरदस्त आहे. शाहिद कपूरसाठी रिस्पेक्ट,” अशी पोस्टही व्हायरल होत आहे.
एका रिव्ह्यूमध्ये तर थेट “ब्लॉकबस्टर” असा शिक्का मारण्यात आला असून 4.5/5 रेटिंग देत शाहिदच्या अभिनयाला ‘झकास’ म्हटलं आहे. त्याचबरोबर तृप्ती डिमरीसह संपूर्ण कलाकारांनी दमदार काम केल्याचंही प्रेक्षक सांगत आहेत.
स्वतःला फिल्म क्रिटिक म्हणवणारे कमाल आर खान यांनीही इंटरव्हलपर्यंतचा अनुभव शेअर करत तृप्ती डिमरीच्या भूमिकेचं विशेष कौतुक केलं आहे. त्यांच्या मते, हा तृप्तीचा आजवरचा सर्वोत्तम रोल असून दिग्दर्शक विशाल भारद्वाज पुन्हा एकदा त्यांच्या ‘टॉप फॉर्म’मध्ये दिसत आहेत. चित्रपटात फरीदा जलाल, दिशा पटानी, अविनाश तिवारी आणि नाना पाटेकर यांसारखे कलाकार आहेत, तर तमन्ना भाटिया आणि विक्रांत मॅसी स्पेशल अपीयरन्समध्ये झळकले आहेत.
दरम्यान, बॉक्स ऑफिसवर ‘ओ’रोमियो’ची थेट टक्कर शनाया कपूर आणि आदर्श गौरव यांच्या ‘‘तू या मैं' या चित्रपटाशी झाली आहे. मात्र सध्याचा सोशल मीडिया ट्रेंड पाहता ‘ओ’रोमियो’ने सुरुवातीला आघाडी घेतल्याचं चित्र आहे.
एकूणच, शाहिद कपूरचा रॉ अवतार, तृप्ती डिमरीची सरप्राइझिंग कामगिरी आणि विशाल भारद्वाजची स्टायलिश मांडणी, या सगळ्यांच्या जोरावर ‘ओ’रोमियो’ प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवत आहे. पुढील काही दिवसांत बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट किती मोठा धमाका करतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.