Munna Bhai MBBS actor Vishal Thakkar File Photo
मनोरंजन

Vishal Thakkar: मुन्नाभाई MBBS मधील अभिनेता ५०० रुपये घेऊन घराबाहेर पडला अन् १० वर्षांपासून बेपत्ता; आई आजही पाहतेय वाट

‘मुन्नाभाई एमबीबीएस’मधील छोट्या भूमिकेमुळे प्रसिद्ध झालेला अभिनेता विशाल ठक्कर २०१६ मध्ये अचानक बेपत्ता झाला. घरातून ५०० रुपये घेऊन बाहेर पडलेल्या विषालचा त्यानंतर कोणताही ठोस ठावठिकाणा लागलेला नाही.

मोहन कारंडे

Munna Bhai MBBS actor Vishal Thakkar missing case

मुंबई: मुन्नाभाई एमबीबीएस या गाजलेल्या चित्रपटात ब्रेकअपमुळे जीवन संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाची भूमिका केलेला अभिनेता विशाल ठक्कर गेल्या १० वर्षांपासून गूढरीत्या बेपत्ता आहे. ३१ डिसेंबर २०१५ च्या रात्री आईकडून ५०० रुपये घेऊन घराबाहेर पडलेला विशाल आजतागायत परतलेलाच नाही.

विशालने चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात काम केले. ‘टँगो चार्ली’सह अनेक चित्रपटांत तो झळकला. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, ‘थपकी प्यार की’, ‘आहट’, ‘किस देश में है मेरा दिल’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्येही त्याने भूमिका साकारल्या. चित्रपटांपासून अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेला विशाल नेमका कुठे गायब झाला, याचे उत्तर पोलीस आणि त्याचे कुटुंब आजही शोधत आहेत.

३१ डिसेंबरच्या 'त्या' रात्री काय घडले?

३१ डिसेंबर २०१५ रोजी विषाल मुलुंड येथील आपल्या कुटुंबीयांसोबतच्या घरी होता. ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या २०१९ मधील वृत्तानुसार, त्याने आई दुर्गा यांना त्याच्यासोबत ‘स्टार वॉर्स : द फोर्स अवेकन्स’ हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात येण्यास सांगितले होते. मात्र त्या त्याच्यासोबत गेल्या नाहीत. मुलाला शेवटचे पाहण्याची ती संधी होती, याची त्यांना आजही खंत वाटते.

रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास विशालने आईकडून ५०० रुपये घेतले आणि घराबाहेर पडला. रात्री १ वाजेच्या सुमारास त्याने वडिलांना "मी पार्टीला जात आहे, उद्या भेटू" असा मेसेज पाठवला. तोच त्याचा कुटुंबासोबतचा शेवटचा संवाद ठरला. १ जानेवारी २०१६ च्या सकाळी विशाल बेपत्ता झाल्याचे समोर आले. त्यावेळी तो ३० वर्षांचा होता.

अहमदाबाद हायवे आणि शेवटचा सोशल मीडिया मेसेज

पोलीस तपासात मिळालेल्या माहितीनुसार, विशालने नववर्षाचे स्वागत आपल्या प्रेयसीसोबत अहमदाबाद हायवेवरील एका रिसॉर्टमध्ये केले होते. १ जानेवारीच्या सकाळी घोडबंदर रोडवरील 'फाउंटन हॉटेल'जवळ चहा घेत असताना, विशालने अंधेरी येथे एका मित्राला आणि शूटिंगसाठी जायचे असल्याचे सांगून रिक्षा पकडली. दुपारी १२:१० वाजता त्याने फेसबुकवर 'हॅपी न्यू इयर'ची शेवटची पोस्ट केली. त्यानंतर त्याचा फोन बंद झाला तो आजपर्यंत सुरू झालेला नाही. त्याच्या बँक खात्यातूनही त्यानंतर कोणताही व्यवहार झालेला नाही.

मुलुंड पोलिस ठाण्यात विशालच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल करणारे तत्कालीन तपास अधिकारी महेंद्र पुरी यांनी २०१९ मध्ये ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, सुरुवातीला विशालच्या प्रेयसीच्या सहभागाची शक्यताही तपासण्यात आली होती. मात्र तिच्या जबाबात कोणतीही विसंगती आढळली नाही. पोलीस निरीक्षक एन. ए. कुलकर्णी यांनी या प्रकरणाबाबत बोलताना, ‘हा खून आहे, अपहरण आहे की तो स्वतःहून निघून गेला, हे आम्हाला माहीत नाही,’ असे म्हटले होते.

प्रेयसीने केली होती बलात्कार आणि मारहाणीची तक्रार

विशाल बेपत्ता होण्याच्या सुमारे तीन महिने आधी, ऑक्टोबर २०१५ मध्ये तो एका वादात अडकला होता. त्यावेळी त्याची प्रेयसी आणि स्वतःही दूरचित्रवाणी क्षेत्रात काम करणाऱ्या अभिनेत्रीने विशालविरोधात बलात्कार आणि मारहाणीची तक्रार दाखल केली होती. नंतर हा वाद मिटला असला, तरी या प्रकरणामुळे तो मानसिकदृष्ट्या खूप खचला होता आणि त्याला काम मिळणेही कठीण झाले होते, असे त्याच्या आईने सांगितले. नंतर आरोप करणाऱ्या त्या अभिनेत्रीचाही एका आजारपणामुळे मृत्यू झाला.

‘मुन्नाभाई’मधील भूमिकेपलीकडेही होती ओळख

‘मुन्नाभाई एमबीबीएस’मधील काही मिनिटांच्या भूमिकेमुळे विशालला ओळख मिळाली असली, तरी त्याची अभिनय कारकीर्द त्यापेक्षा मोठी होती. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’पूर्वी त्याने मधुर भांडारकर यांच्या ‘चांदनी बार’मध्येही काम केले होते. त्यानंतर ‘तुम : अ डेंजरस ऑब्सेशन’ आणि ‘टँगो चार्ली’ या चित्रपटांतही तो दिसला. दूरचित्रवाणीने त्याला मोठ्या प्रमाणात कामाच्या संधी मिळवून दिल्या. ‘आहट’, ‘किस देश में है मेरा दिल’, ‘कहानी हमारे महाभारत की’, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, ‘अदालत’, ‘धर्मक्षेत्र’, ‘सावधान इंडिया’ आणि ‘थपकी प्यार की’ यांसारख्या मालिकांमध्ये त्याने भूमिका साकारल्या.

अभिनेत्री जया भट्टाचार्य यांनीही व्यक्त केली होती चिंता

‘थपकी प्यार की’ या मालिकेत विशालसोबत काम केलेल्या अभिनेत्री जया भट्टाचार्य यांनी २०१९ मध्ये ‘स्पॉटबॉयई’ला दिलेल्या मुलाखतीत त्याच्याबद्दल आठवणी सांगितल्या होत्या. विशाल बेपत्ता होण्यापूर्वीच्या काळात तो काहीसा अस्वस्थ दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. जया यांनी सांगितले की, विशालसोबत त्यांची ओळख त्याच्या बालकलाकाराच्या दिवसांपासून होती. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेत काम करत असताना त्यांची पहिली ओळख झाली होती. अनेक वर्षांनंतर ‘थपकी प्यार की’मध्ये दोघांनी पुन्हा एकत्र काम केले. त्यावेळी विशालनेच त्यांना ओळखले आणि जुन्या ओळखीची आठवण करून दिली. ‘तो अस्वस्थ होता; मात्र आपण अजूनही त्याला शोधू शकलेलो नाही, याचे मला खूप दुःख आहे,’ असे जया यांनी म्हटले होते.

दहा वर्षांनंतरही तपासात ठोस धागा नाही

तपासादरम्यान पोलिसांना कोणत्याही प्रकारच्या खंडणीचा किंवा अपघात अथवा हत्येचे पुरावे सापडले नाहीत. "ही हत्या आहे, अपहरण आहे की तो स्वतःहून निघून गेला आहे, हे सांगणे कठीण आहे," असे तत्कालीन तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. शेकडो बेपत्ता लोकांचा शोध घेणाऱ्या मुंबई पोलिसांच्या विशेष पथकानेही देशभरात त्याचे फोटो फिरवले; मात्र, १० वर्षे उलटूनही विशाल ठक्करचा कोणताच सुगावा लागलेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT