मुंबई : स्वप्निल कुलकर्णी
काही महिन्यांपासून चांगली नाटकं रंगभूमीवर येत आहेत. असे असताना राज्यातील अनेक नाट्यगृहे मात्र अजूनही खराब अवस्थेत आहेत. सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी वर्षभरापूर्वी सर्वंकष नाट्यगृह धोरण आणण्याची घोषणा केली होती. मात्र वर्ष उलटूनही त्याला मूर्त रूप मिळाले नाही. त्यामुळे एकीकडे मराठी नाटक मोठं होताना काही नाट्यगृहांची दुरवस्था कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील वर्षी सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी नाट्यगृह कसे असावे, कलावंतांना व प्रेक्षकांना काय सुविधा असाव्यात याबद्दल नाट्यगृह धोरण जाहीर करण्याची घोषणा केली होती.
राज्य सांस्कृतिक कार्यविभाग आणि मुंबई फिल्मसिटी यांच्या समन्वयातून हे धोरण तयार करण्यात येत आहे. मुंबई फिल्मसिटीचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी सांगितले की, पूर्वी हा विषय राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडे होता. आता मुंबई फिल्म सिटीदेखील त्यावर काम करत आहे. आम्ही यावर सविस्तर अहवाल
तयार केला असून तो सांस्कृतिक कार्य विभागाकडे पाठवला आहे. आता तेच यावर निर्णय घेतील. दरम्यान, सांस्कृतिक कार्य विभागाने याबद्दलचा सविस्तर अहवाल तयार केला असून मंत्रालय कार्यालयाकडे तो मंजुरीसाठी पाठवल्याचे विश्वसनीय सूत्रांनी दै. 'पुढारी'शी बोलताना सांगितले. राज्यात शंभरहून अधिक नाट्यगृहे आहेत.
पुणे-मुंबईमधील नाट्यगृहांची अवस्था चांगली असून, इतरत्र परिस्थिती बिकट आहे. जिल्हावार नाट्यगृहे आहेत, पण त्यांची देखभाल नीट होत नाही. अभिनेते शरद पोंक्षे यांनी बीडमधील, अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने परभणीतील तर भरत जाधव यांनी रत्नागिरीमधील नाट्यगृहांबाबत नाराजी व्यक्त केली होती. विदर्भ, खानदेश, मराठवाडा आदी भागांतील नाट्यगृहांची अवस्था बिकट असल्याचे समजते. त्यामुळे येथील नाट्यगृहांचे करायचे काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. अपुरी स्वच्छतागृहे, अस्वच्छ व अंधारे मेकअप रूम, खराब वातानुकूलन यंत्रणा आणि निकृष्ट ध्वनिव्यवस्था यामुळे कलाकार व प्रेक्षकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. नाट्यकर्मीनी अनेकदा याबाबत नाराजी व्यक्त केली.
चर्चा, बैठका झाल्या, मात्र नाट्यगृहांची अवस्था 'दीन'च राज्यातील अनेक नाट्यगृहांची दुरवस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत रंगकर्मीनी अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. यापूर्वी २०१६ मध्ये नाट्यगृहांच्या नूतनीकरणासाठी राज्य सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली होती. मात्र त्यावर पुढे काही काम झाले नाही. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाट्यगृहांच्या समस्यांबाबत रंगकर्मीची बैठकीची बोलावली होती. त्यामध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी नाट्यगृहांच्या समस्यांचा पाढाच वाचला होता. त्यानंतर नाट्यगृहांबाबत कोणत्या सुधारणा करता येतील याबाबत सव्र्व्हेही झाला. मात्र अद्यापही अनेक नाट्यगृहांची अवस्था 'दीन'च असल्याचे पाहायला मिळत आहे.
राज्यातील काही मोजकीच नाट्यगृहे चांगल्या स्थितीत आहेत. राज्य शासनाचा नवीन नाट्यगृहे बांधण्याचा विचार आहे. काही ठिकाणी नवीन नाट्यगृहे बांधण्यात देखील आली आहेत; परंतु नवीन नाट्यगृह बांधण्यापेक्षा जी जुनी नाट्यगृहे आहेत, ती सुस्थितीत कशी राहतील आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त नाटकांचे प्रयोग कसे होतील यावर विचार होणे गरजेचे आहे.
- विजय केंकरे, ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक
कोरोनानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाट्यर्मीची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत आम्ही नाट्यगृहांबाबत समस्या मांडल्या होत्या. मध्यंतरी त्यांनी नाट्यगृहांच्या सुधारणेबाबत दीर्घकालीन कोणत्या उपाययोजना अपेक्षित आहेत याचा आढावा घेतला होता. मात्र त्याचे पुढे काही झाले नाही.
- प्रशांत दामले, अध्यक्ष, अखिल भारतीय नाट्य परिषद