Akshay Waghmare Marathi Chitrapat Mahamandal Election: अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या आगामी निवडणुकीकडे सध्या संपूर्ण मनोरंजन विश्वाचे आणि रसिक प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने चित्रपट महामंडळात मोठ्या प्रमाणावर राजकारण केले जात असल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून सातत्याने केला जात आहे. या संपूर्ण राजकीय चिखलफेकीवर आता मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अक्षय वाघमारे याने अत्यंत रोकठोक भाष्य केले असून, महामंडळाच्या सद्यस्थितीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
निवडणुकीतील राजकारणावर जाहीर नाराजी व्यक्त करताना अक्षय वाघमारे म्हणाला, "सध्या महामंडळाच्या निवडणुकीत कोण राजकारण करतंय, यावर चर्चा किंवा वाद घालण्यापेक्षा इंडस्ट्रीतील तंत्रज्ञ, लेखक, अभिनेते आणि इतर कामगारांचे जे पैसे अडकले आहेत, त्यावर भांडलो तर जास्त बरं होईल. सध्या चित्रपट आणि मालिका विश्वात 'राजा तुपाशी आणि बाकी सगळे उपाशी' अशी अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे." अनेक लहान-मोठ्या कलाकारांची आणि तंत्रज्ञांची फसवणूक होत असल्याकडे त्याने लक्ष वेधले.
अक्षयने विशेषतः 'मालिका' (सीरियल्स) या माध्यमातील मनमानी कारभारावर बोट ठेवले आहे. त्याने सांगितले की, मालिकांमध्ये काम करणाऱ्या अनेक लोकांचे पैसे अडकलेले आहेत. निर्माते कलाकारांचे आणि तंत्रज्ञांचे पैसे वेळेवर द्यायला प्रचंड टाळाटाळ करतात. हे थकीत मानधन अगदी २० हजारांपासून ते तब्बल ४० लाख रुपयांपर्यंत आहे. अनेक हतबल कलाकार आपले हक्काचे पैसे काढून मिळवण्यासाठी वारंवार फोन करत असतात. त्यामुळे मालिका या माध्यमावर वचक आणि नियंत्रण ठेवण्यासाठी महामंडळाने काहीतरी ठोस कायदेशीर उपाययोजना करायला हवी, अशी आग्रही मागणी अक्षयने केली आहे.
महामंडळाला या दुरवस्थेतून बाहेर काढण्यासाठी आणि कलाकारांना न्याय मिळवून देण्यासाठी तरुण रक्ताची गरज असल्याचे अक्षयने आवर्जून नमूद केले. या निवडणुकीच्या निमित्ताने तरुण सभासदांनी आणि कलाकारांनी मोठ्या संख्येने पुढे आले पाहिजे. केवळ मतदानापुरते मर्यादित न राहता तरुणांनी महामंडळाचा कारभार आणि सूत्रे आपल्या हातात घेतली पाहिजेत, तरच कलाकारांचे प्रश्न खऱ्या अर्थाने सुटू शकतील, असा विश्वासही त्याने शेवटी व्यक्त केला.