Anita Date On TV Serials pudhari
मनोरंजन

Anita Date On TV Serials: 'एक मालिका कलाकाराचे वय वाढवते...', अनिता दातेला असं का वाटते?

Anita Date Podcast: सतत डेली सोप, टीव्ही मालिका करण्याचा तुमच्यावर शारीरिक आणि मानसिक परिणाम होतो.

Anirudha Sankpal

Anita Date On TV Serials: माझ्या नवऱ्याची दुसरी बायको फेम अनिता दाते - केळकर या मराठी अभिनेत्रीने नुकतेच मित्र म्हणे या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. त्यावेळी तिने सतत डेली सोप, टीव्ही मालिका करण्याचा तुमच्यावर कसा शारीरिक आणि मानसिक परिणाम होतो हे सांगितलं. यावेळी अनिताने एक टीव्ही मालिका कलाकाराचे वय कसे वाढवते हे सांगितलं.

आम्ही १३ तास काम करतोय

मुलाखतीत अनिता दाते केळकर म्हणाली की, एक मालिका करत असताना ती मालिका तुमचे वय वाढवते. समजा मी चार वर्षे मालिका करतेय. दिवसाला १३ तास काम करतेय. इतर माणसे आठ तास काम करतात. आम्ही १३ तास काम करतो. त्यानंतर घर ते शूट लोकेशनपर्यंतच्या प्रवासासाठी लागणारा वेळ वेगळा.

मालिका करताना अस्वस्थ का होता?

अनिता पुढे म्हणते, 'तुमचं फॅमिली लाईफ राहत नाही. तुम्ही स्वतःची काळजी घेऊ शकत नाही पुरेशी. तुम्हाला शांतता नसते. तुमचे केस, तुमची त्वचा, तुमचं शरीर हे दुपटीने काम करतं. एवढे लाईट्स, त्याच्यानंतर मेकअप, तुमचं तिथे थांबणं. याचा सर्वांचा तुमच्यावर परिणाम होतो.

मालिकेच्या शूटिंगवेळीचा अनुभव कसा असतो याबाबत बोलताना अनिता दाते म्हणते, त्या ठिकाणी तुम्हाला हवी असलेली नको असलेली सगळी माणसं असतात. त्यात आपल्याला सतत वाटत असतं की आपलं शोषण होत आहे. थोडा वेळ जास्त काम करावं लागतं त्यावेळी वाटतं. साडी वाईट आली तरी वाटत राहतं. म्हणजे तुम्ही इतके संवेदनशील होऊन जाता की तुम्हाला सतत आपलं शोषण होत आहे असं वाटत राहतं. दुसऱ्याला जास्त डायलॉग आले तरी कधी कधी त्रास होतो.

टीव्ही मालिकांचा अभ्यास करायचा म्हणजे काय?

माझ्या नवऱ्याची बायको ही माझी पहिली दैनंदिन मालिका. मी याआधी काम केलं असलं तरी ही माझा पहिलाच डेली सोप. टीव्ही मालिका हे प्रकारचे रेडिओ आहे. महिला काम करता करता मालिका बघत असतात. त्यामुळे आवाजावर मेहनत घ्यावी लागते. संवादातील एखादे वाक्य पुन्हा पुन्हा म्हणावं लागते. कारण प्रेक्षक महिलेला आधी काय घडलं हे लक्षात राहिलच असं नाही. त्यामुळे मालिकेत काम करण्यासाठी टीव्ही शिकणं गरजेचं आहे, असे अनिताने सांगितले.

मालिका करत असताना सिनेमाही केला

अनिताने 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिका करत असताना 'मी वसंतराव..' चित्रपटही केला होता. याबद्दल अनिता म्हणते, तीन दिवस मालिका आणि उरलेले चार दिवस चित्रपट. एक शूट मुंबईत आणि दुसरं शूट नागपूरमध्ये होते. किमान महिनाभर माझं हेच वेळापत्रक होतं. दोन्ही गोष्ट एकाच वेळी करणं अशक्य आहे असं मला अनेकांनी सांगितलं. पण मी आव्हान सहज पार पाडलं.

अनिताने केलेली नोकरी

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेत अनिता दातेने नोकरी केली होती. नाशिक शाखेचे अकाऊंट विभागात ती कार्यरत होती. याच काळात अनिताची नाट्यक्षेत्रातील मंडळींशी ओळख झाली होती. इथूनच अनिताच्या नाट्यक्षेत्रातील कारकिर्दीला सुरूवात झाली. अनिताचे बाबाही नाट्यक्षेत्राशी संबंधित होते. राज्यनाट्य स्पर्धा, कामगार नाट्य स्पर्धांमधील नाटकांचे ते दिग्दर्शन करायचे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT