बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित सध्या कॅनडातील टोरोंटो शोमुळे चर्चेत आहे. ‘दिल से... माधुरी’ या नावाने झालेल्या या लाईव्ह कार्यक्रमातील गोंंधळामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर तक्रार केली की कार्यक्रम वेळेवर सुरू झाला नाही, तसेच शोचा फॉर्मॅट जाहीर केलेल्या अपेक्षांप्रमाणे नव्हता. काही प्रेक्षकांनी तो ‘कन्सर्ट’ नसून ‘टॉक शो’सारखा वाटल्याचं सांगितलं, तर काहींनी माधुरीच्या उशिरा येण्याबाबत नाराजी व्यक्त केली. या वाढत्या वादावर आता आयोजकांनी अधिकृत स्पष्टीकरण दिलं आहे.
कार्यक्रमाचे आयोजक ‘ट्रू साउंड लाईव्ह लिमिटेड’ यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवा पूर्णपणे दिशाभूल करणाऱ्या आहेत. त्यांच्या मते, शो ठरलेल्या वेळेवरच सुरू झाला होता आणि सुरुवातीला इंडियन आयडॉलच्या गायकांनी परफॉर्मन्स सादर केला. आयोजकांनी सांगितलं की, कार्यक्रमाचं वेळापत्रक पूर्वनियोजित होतं, पण माधुरी दीक्षित यांच्या टीमकडून चुकीची वेळ कळवण्यात आली, त्यामुळे उशीर झाला.
कंपनीच्या मते, शोचं शेड्यूल आधीच ठरलेलं होतं. रात्री 8.30 वाजता प्रश्नोत्तर सत्र आणि त्यानंतर 60 मिनिट माधुरी दीक्षित यांचा लाईव्ह परफॉर्मन्स होणार होता. प्रोडक्शन टीम पूर्ण तयार होती, मात्र माधुरीच्या मॅनेजमेंट टीमने कॉल टाइम संदर्भात चुकीची माहिती दिल्याने त्या सुमारे रात्री 10 वाजता कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचल्या, आणि यामुळे कार्यक्रमाला उशीर झाला.
‘ट्रू साउंड लाईव्ह लिमिटेड’च्या म्हणण्यानुसार, स्टेजची रचना, लाईटिंग, साउंड सिस्टीम, प्रेक्षक व्यवस्थापन आणि वेळापत्रक याची पूर्ण तयारी करण्यात आली होती. कंपनीने फॅन्सना विनंती केली की त्यांनी उपलब्ध व्हिडिओ पाहावेत. ज्यामध्ये माधुरी दीक्षित यांचा स्टेजवरील परफॉर्मन्स स्पष्टपणे दिसत आहे.
आयोजकांनी पुढे सांगितलं की बॅकस्टेजवर काही व्यक्तींच्या गोंधळामुळे परिस्थिती बिघडली. त्यात श्रेया गुप्ता नावाच्या व्यक्तीचा उल्लेख करत त्यांनी सांगितलं की काही लोक खासगी व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये व्यस्त असल्याने समन्वय साधला गेला नाही आणि त्यामुळे कार्यक्रमाच्या वेळेत गोंधळ निर्माण झाला.
2 नोव्हेंबरला टोरोंटोमधील ग्रेट कॅनेडियन कॅसिनो रिसॉर्ट येथे हा कार्यक्रम पार पडला.
मोठ्या संख्येने भारतीय प्रेक्षक उपस्थित होते. मात्र कार्यक्रमानंतर अनेकांनी सोशल मीडियावर “हा शो अपेक्षांवर उतरला नाही” अशी प्रतिक्रिया दिली. काहींनी याला “वेळ आणि पैशांचा अपव्यय” म्हटलं, तर काहींनी “हा कन्सर्ट नव्हे, टॉक शो होता” असं म्हटलं.
या सर्व प्रतिक्रियांनंतर आयोजकांनी प्रेक्षकांचे आभार मानले आणि सांगितलं की,
ते सर्वांच्या भावना समजू शकतात आणि पुढील शोमध्ये याची काळजी घेतली जाईल.