Madhur Virli Controversy: '370 रुपयांचा बिर्याणी' वाद अजूनही शांत झालेला नसतानाच आता आणखी एका स्टँड-अप कॉमेडियनचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कॉमेडियन माधुर विरली याने आपल्या एका स्टँड-अप शोमध्ये बलात्कारासारख्या गंभीर विषयावर केलेल्या विनोदामुळे नेटिझन्स संतापले असून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
काही दिवसांपूर्वी कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमधील '370 रुपयांच्या बिर्याणी' संदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओत गुरुग्राममधील हिमांशू जांगरा नावाच्या तरुणाने डेटवर झालेला अनुभव सांगताना केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.
"370 रुपये खर्च केले आहेत, ते वसूल करणारच," असे त्याने म्हटल्याने सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या प्रकरणानंतर हिमांशू जांगरा याला नोकरी गमवावी लागली, तर प्रणित मोरेलाही मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले.
दरम्यान, आता माधुर विरलीचा एक जुना स्टँड-अप व्हिडिओ पुन्हा चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये तो बलात्कारासारख्या संवेदनशील विषयावर विनोद करताना दिसत असल्याचा आरोप केला जात आहे. हा व्हिडिओ पुन्हा व्हायरल होताच सोशल मीडिया युजर्सनी नाराजी व्यक्त केली.
'sachya2002' नावाच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. पोस्टमध्ये लिहिले आहे की, "लोकांना हसवण्यासाठी जर एखाद्याच्या आयुष्यातील सर्वात भयानक अनुभवावर विनोद करावा लागत असेल, तर ती कॉमेडी नसून असंवेदनशीलता आहे."
या पोस्टनंतर अनेकांनी माधुर विरलीवर टीका केली. काहींनी अशा प्रकारच्या विनोदांना 'कॉमेडी' म्हणणे चुकीचे असल्याचे म्हटले, तर काहींनी बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याचे सामान्यीकरण करण्याचा प्रयत्न होत असल्याची चिंता व्यक्त केली.
एका युजरने लिहिले, "बलात्कारावर विनोद करणे आणि त्यावर टाळ्या वाजवणे दोन्ही तितकेच धक्कादायक आहे." तर दुसऱ्या एका युजरने, "ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाब नसून पीडितांच्या वेदनांची थट्टा आहे," अशी प्रतिक्रिया दिली.
या संपूर्ण वादामुळे पुन्हा एकदा स्टँड-अप कॉमेडीच्या मर्यादा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक जबाबदारी यावर चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर अनेक जण अशा प्रकारच्या विनोदांविरोधात कठोर भूमिका घेत आहेत, तर काहीजण कॉमेडी आणि संवेदनशील विषय यामधील सीमारेषा कुठे आखायची याबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत.
सध्या या प्रकरणावर माधुर विरलीकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र सोशल मीडियावरील वाद दिवसेंदिवस वाढत असून हा वाद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.