

NEET UG Re-Exam 2026: NEET UG 2026 पुनर्परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) मोठा दिलासा दिला आहे. विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या सुचनेच्या आधारे परीक्षेचा कालावधी 180 मिनिटांवरून 195 मिनिटांपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना परीक्षा पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त 15 मिनिटे मिळणार आहेत.
NTA च्या नव्या सूचनेनुसार, NEET UG 2026 पुनर्परीक्षा दुपारी 2 ते सायंकाळी 5.15 या वेळेत होणार आहे. यामध्ये उपस्थिती पत्रकावर स्वाक्षरी करणे, तपासणी आणि इतर अनिवार्य प्रशासकीय प्रक्रिया यासाठी लागणारा वेळही समाविष्ट करण्यात आला आहे.
याशिवाय प्रश्नपत्रिकेत रफ वर्कसाठी दिल्या जाणाऱ्या जागेतही वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांना दोन पाने उपलब्ध करून दिली जात होती. आता चार पाने रफ वर्कसाठी दिली जाणार आहेत. विशेष म्हणजे डावखुऱ्या विद्यार्थ्यांची सोय लक्षात घेऊन प्रश्नपत्रिकेची मांडणीही बदलण्यात आली आहे. सुरुवातीच्या सूचना पानानंतर दोन रफ वर्कची पाने दिली जातील, तर उर्वरित दोन पाने प्रश्नपत्रिकेच्या शेवटी असतील.
NTA ने म्हटले आहे की, परीक्षेच्या रचनेतील अशा छोट्या सुधारणा विद्यार्थ्यांचा अनुभव अधिक चांगला बनवू शकतात. त्यामुळे उमेदवारांनी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात तसेच परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.
दरम्यान, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी NEET UG 2026 पुनर्परीक्षा कोणत्याही त्रुटीशिवाय पार पडेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. NTA मुख्यालयात तयारीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी सांगितले की, परीक्षा प्रक्रिया पारदर्शक आणि सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने व्यापक उपाययोजना केल्या आहेत. तसेच निकालही वेळेत जाहीर केला जाईल, जेणेकरून शैक्षणिक वेळापत्रकावर कोणताही परिणाम होणार नाही.
विद्यार्थ्यांना कोणतीही शंका असल्यास NTA हेल्पलाइन क्रमांक +91-11-40759000 वर संपर्क साधता येईल किंवा neetug2026@nta.ac.in या ई-मेलवर प्रश्न विचारता येतील. परीक्षेबाबतची पुढील माहिती NTA च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे.