Lalit Prabhakar - Vidula Chougule new movie super duper trailer out  pudhari photo
मनोरंजन

Lalit Prabhakar - Vidula Chougule | एकाच फ्लॅटवर दोन कुटुंबांचा दावा! ललित प्रभाकर-विदुला चौगुलेचा 'सुपर डुपर' राडा; ट्रेलर प्रदर्शित

Lalit Prabhakar - Vidula Chougule Super Duperr Trailer | एक फ्लॅट, २ कुटुंब..तुफान राडा! ललित प्रभाकर-विदुला चौगुलेचा ‘सुपर डुपर’ धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

स्वालिया न. शिकलगार

मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय ललित प्रभाकर आणि 'जीव झाला येडापिसा' फेम विदुला चौगुले पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर येत आहेत. त्यांच्या 'सुपर डुपर' या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. एकाच फ्लॅटची दोन वेगवेगळ्या कुटुंबांना झालेली विक्री आणि त्यातून निर्माण होणारा गोंधळ ही या चित्रपटाची मूळ कथा आहे.

super duper film trailer released

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वेगवेगळ्या विषयांवर प्रयोग होताना दिसत आहेत. अशातच अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री विदुला चौगुले यांच्या मुख्य भूमिका असलेला 'सुपर डुपर' हा चित्रपट चर्चेत आला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.

ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले यांची फ्रेश जोडी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एकमेकांवर कुरघोडी करणारे एकापेक्षा एक कलाकार ट्रेलरमध्ये दिसताहेत. झी स्टुडिओज प्रस्तुत, नाईंटी नाइन प्रॉडक्शन्स आणि सिद्धिविनायक प्रॉडक्शन्स निर्मित तथा समीर आशा पाटील दिग्दर्शित सुपर डुपर हा चित्रपट येत्या ३ एप्रिलला प्रदर्शित होत आहे.

सुपर डुपर चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये काय आहे?

ट्रेलरमध्ये एका घराभोवती फिरणारी ही कथा आहे. एका बाजूला परंपरा जपणारे गावाकडचे कुटुंब, तर दुसऱ्या बाजूला आधुनिक विचारांची कास धरणारी शहरातलं तरुण जोडपं. या दोन्ही कुटुंबांना एकाच फ्लॅटची विक्री होते आणि या घराच्या ताब्यावरून वादाची ठिणगी पडते. आता एकच घर आणि राहणारे दोन टोकाचे गट, दोघांची जीवनशैली, सवयी आणि विचार अगदी वेगळे असल्यामुळे एकत्र राहतानाची त्यांची मजेशीर जुगलबंदी ट्रेलरमध्ये दिसत आहे. दरम्यान, या सगळ्या गोंधळात ‘झाड उगायला माती आणि माणूस जगायला नाती लागतातच’ हा निर्मिती सावंत यांच्या तोंडी असलेला भावस्पर्शी संवादही ट्रेलरमध्ये लक्ष वेधून घेतो.

कलाकार कोण?

या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केले आहे. विजय शिंदे आणि नरेश बोर्डे निर्माते असून उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ते आहेत. तर छायांकन संजय जाधव यांचे आहे. निर्मिती सावंत, शशांक शेंडे, हृषिकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके, प्रतीक्षा कोते यांच्यासह ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले हे कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.

या ट्रेलर लाँच प्रसंगी दिग्दर्शक समीर आशा पाटील म्हणाले, 'सुपर डुपर’ हा केवळ विनोदी चित्रपट नाही, तर नात्यांमधल्या गंमतीजमती आणि त्यामागची भावनिक बाजू दाखवणारा प्रवास आहे. दोन पूर्णपणे वेगळ्या स्वभावाची कुटुंबे एकाच घरात राहायला लागली की, किती गंमतीशीर प्रसंग घडू शकतात, हे आम्ही हलक्या-फुलक्या पद्धतीने मांडलं आहे.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT