'लगान'च्या 25 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित सोहळ्यात अभिनेत्री ग्रेसी सिंग सहभागी झाली होती. या कार्यक्रमातील आमिर खानसोबतचा तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेक वर्षांनंतर दिसलेल्या तिच्या नव्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले असून त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
Lagaan actress New Look viral
बॉलिवूडमधील अजरामर चित्रपटांपैकी एक मानला जाणारा 'लगान' पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विशेष सोहळ्यात कलाकारांची उपस्थिती पाहायला मिळाली. मात्र या कार्यक्रमात सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते 'गौरी'ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ग्रेसी सिंग हिने.
२००१ साली प्रदर्शित झालेल्या 'लगान'मध्ये ग्रेसी सिंगने साकारलेली गौरी प्रेक्षकांच्या मनात आजही ताजी आहे. साधी, निरागस आणि खंबीर ग्रामीण तरुणी म्हणून तिने साकारलेली भूमिका प्रचंड गाजली होती. आता तब्बल २५ वर्षांनंतर ती पुन्हा एकदा चाहत्यांसमोर आली असून तिच्या बदललेल्या लूकची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.
'लगान'च्या रौप्यमहोत्सवी सोहळा आणि आमिर खान प्रोडक्शन्सच्या २५ व्या वर्षापूर्तीनिमित्त ग्रेसी सिंगने उपस्थिती लावली. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमातील काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केली. विशेष म्हणजे, आमिर खानसोबतचा तिचा एक फोटो चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. अनेक वर्षांनंतर 'भुवन' आणि 'गौरी' पुन्हा एकाच फ्रेममध्ये दिसल्याने चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
काळानुसार तिच्या व्यक्तिमत्त्वात बदल झाला असला तरी तिचे हास्य आणि सहजता आजही तितकीच मोहक असल्याचे चाहते म्हणत आहेत. आशुतोष गोवारीकर यांचा ऑस्करसाठी नामांकित झालेला चित्रपट 'लगान'मध्ये तिने गौरीची भूमिका साकारली होती.
या कार्यक्रमात अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी जुही चावला, तिचे पती जय मेहता, सोफी चौधरी, वीर दास, सुनील ग्रोव्हर, झोया अख्तर, काजोल, शेनाज ट्रेझरी तसेच राजेंद्रनाथ झुत्शी, यशपाल शर्मा, आदित्य लाखिया, अखिलेंद्र मिश्रा यांचा समावेश होता. तसेच, चित्रपट निर्माते राजकुमार हिरानी हे देखील आशुतोष गोवारीकर आणि त्यांच्या पत्नी सुनीता गोवारीकर यांच्यासोबत उपस्थित होते. यावेळी आमिर खानचा मुलगा जुनैद खानही तिथे हजर राहिला होता.