मनोरंजन

Upcoming Marathi Movies : एकापेक्षा एक येणार हटके नावांचे मराठी चित्रपट

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

आशयपूर्ण कथा आणि त्याचं तेवढंच आकर्षक शीर्षक हे कुठल्याही चित्रपटासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. अनोख्या शीर्षकांच्या चित्रपटांसाठीही मराठीसृष्टी ओळखली जाते. (Upcoming Marathi Movies) आता या वर्षभरात एकापेक्षा एक चित्रपट तुमच्या भेटीला येणार आहेत. तर काही चित्रपटांची रिलीज डेट अद्याप जाहीर झालेली नाही. पण, हटके नावे असलेले चित्रपट आणि या चित्रपटांमध्ये कोणकोणते कलाकार असणार आहेत, हे जाणून घ्या. (Upcoming Marathi Movies)

एक होतं माळीण

सत्य घटनेवर आधारित एक होतं माळीण चित्रपट २९ जुलैला मोठ्या पडद्यावर येणार आहे. एक होतं माळीण चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आलं आहे. जुन्नर तालुक्यातील माळीण गावात २०१४ मध्ये दरड कोसळल्याची दुर्घटना घडली होती. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि दमदार संहिता हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. संतोष म्हात्रे यांनी चित्रपटाची निर्मिती केलीय. रुपेश राणे, अरूण अरुण कोंजे हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची संकल्पना, कथा, पटकथा राजू राणे तर दत्तात्रय गायकर, राजू राणे यांनी चित्रपटाचे संवाद लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. प्रशांत मोहिते, अश्विनी कासार, अभिजित श्वेतचंद्र, सिद्धी पाटणे, अनिल नगरकर, प्रशांत तपस्वी, रामचंद्र धुमाळ, दीपज्योती नाईक यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

आठवा रंग प्रेमाचा

दिग्दर्शक समीर कर्णिक यांचं आठवा रंग प्रेमाचा चित्रपटातून मराठीतील निर्माता म्हणून पदार्पण होत आहे. १७ जूनला मोठ्या पडद्यावर रिंकू राजगुरू आणि विशाल आनंद ही फ्रेश जोडी दिसणार आहे. दिग्दर्शन खुशबू सिन्हा यांचे असून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. विशाल आनंद हा मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. "क्युं हो गया ना.." या आपल्या पहिल्याच चित्रपटापासून बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून समीर यांनी छाप पाडली होती. त्यानंतर "यमला पगला दिवाना", "चार दिन की चांदनी", "हिरोज", "नन्हे जैसलमेर" अशा चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन समीर यांनी केलं आहे.

झॉलीवूड

झॉलीवूड ३ जूनला रिलीज होणार आहे. विदर्भात प्रचंड लोकप्रिय असलेल्या झाडीपट्टी या नाटकाच्या खास प्रकारावरची धमाल चित्रपटातून पाहता येणार आहे. दिग्दर्शक तृषांत इंगळेनं हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. प्रियंका अगरवाल, अंशुलिका दुबे, शाश्वत सिंग यांनी चित्रपटाची निर्मिती केलीय. न्यूटन, शेरनी, सुलेमानी किडा असे दर्जेदार चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले आहेत.

येरे येरे पावसा

एका छोट्याशा खेडेगावातल्या चिमुकल्यांनाही या पावसाची अशीच प्रतीक्षा आहे. त्यासाठी ते आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. त्यांच्या आशा निराशेच्या खेळाची रंगतदार गोष्ट म्हणजे 'येरे येरे पावसा' हा आगामी मराठी चित्रपट. १७ जूनला चित्रपटगृहात येरे येरे पावसा रिलीज होईल. निर्मिती शारीक खान यांची असून दिग्दर्शन शफक खान यांनी केले आहे. ग्यानचंद चौहान, सुमेध गायकवाड कार्यकारी निर्माते आहेत. चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी योगेश एम.कोळी यांनी सांभाळली असून संकलन चंदन अरोरा यांनी केले आहे. कथा भूषण दळवी तर पटकथा शफक खान, भूषण दळवी यांची आहे. संवाद अभिषेक करगुटकर, विनोद जाधव यांनी लिहिले आहेत. अमोल पोवळे यांनी लिहिलेल्या गीतांना सुशांत पवार, किशोर पवार यांनी संगीत दिले आहे. अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांचा स्वरसाज चित्रपटातील गीतांना लाभला आहे. साऊंड चाकीर हुसैन तर कलादिग्दर्शन योगेश इंगळे यांचे आहे. छाया कदम, मिलिंद शिंदे, संदेश जाधव, चिन्मयी साळवी, विनायक पोतदार, आर्या आढाव, प्रदीप नवले, प्राजक्ता वाड्ये, वैभव पाटील, हृषीकेश करळे, नकुल चौधरी, वैष्णवी रानमाळे, उत्कर्ष करळे, अचला पांचाळ यांच्या भूमिका या चित्रपटात आहेत.

शेर शिवराज

शेर शिवराज हा चित्रपट २२ एप्रिलला रिलीज होतोय. 'शेर शिवराज' चित्रपटाची निर्मिती मुंबई मुवी स्डुडिओजचे नितीन केणी, राजवारसा प्रोडक्शनचे प्रद्योत पेंढरकर व अनिल नारायणराव वरखडे, तसेच मुळाक्षरचे दिग्पाल लांजेकर व चिन्मय मांडलेकर यांची आहे. या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अजय पूरकर, वर्षा उसगांवकर, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, अक्षय वाघमारे, विक्रम गायकवाड, आस्ताद काळे, सुश्रूत मंकणी, दीप्ती केतकर, माधवी निमकर आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.

अ व्हॅलेंटाईन्स डे

मराठीतील सर्वात मोठा सस्पेन्स थ्रीलर चित्रपट आगामी मान्सूनमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'आदमखोरी दुनियेत आपलं स्वागत आहे' अशी टॅगलाईन असलेल्या 'अ व्हॅलेंटाईन्स डे' चित्रपटाचे टीझर पोस्टर प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवणारे आहे. भारताचा नकाशा, ३ चा वॉटर मार्क यातून दिग्दर्शकाला नेमकं काय सांगायचं आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडे दिवस वाट पहावी लागणार आहे. या चित्रपटामध्यॆ अभिनेते सुरेश विश्वकर्मा, अरुण कदम, संग्राम सरदेशमुख यांच्यासह आणखी काही कलाकार असणार आहेत. चित्रपटातील एक सुंदर गाणे प्रसिद्ध गीतकार संजय नवगिरे यांनी लिहिले आहे तर दुसऱ्या क्लब सॉंगला बॉलीवूड आणि साऊथ मधील एका बड्या गायिकेने स्वरसाज चढविला असल्याचे समजते. (Upcoming Marathi Movies)

पॅटिस 

अनेकांच्या आवडीच्या खाद्यपदार्थांमध्ये 'पॅटिस'चा अवश्य समावेश असतो. गरम, खमंग 'पॅटिस' म्हणजे खवय्यांसाठी मेजवानीच असते. प्रेमाचंही असंच काहीसं असतं. विश्वास आणि आपुलकीचं सारण छान जमून आलं की प्रेमाची लज्जत अजून वाढते. लव्हेबल प्रेमाची अशीच चटकदार मेजवानी असलेला पोस्टमन फिल्मस प्रस्तुत 'पॅटिस' हा हटके शीर्षकाचा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती डॉ. मानिगंडन मंजुनाथन आणि राहुल पाटील यांनी केली आहे. लेखन आणि दिग्दर्शन धीरज आदिक यांचे आहे. बिपीन सुर्वे आणि श्रेया देशमुख ही जोडी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच ओमकार बोत्रे, अश्विनी भांडे, विनोद खेडकर हे सहाय्यक कलाकार चित्रपटात झळकणार आहेत.

खोटी

ओजस्वी मल्टीमीडियाच्या आगामी 'खोटी' चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. शशिकांत तुपे या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक आहेत. चित्रपटाच्या कथानकाबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. मात्र 'खोटी' या चित्रपटाचा पोस्टर फारच बोलका आहे. हा चित्रपट खेळाडू मुलगी आणि तिच्या कोचवर आधारित असल्याची कल्पना येते. चित्रपटाला मिलिंद मोरे यांचं संगीत लाभलंय. ' खोटी ' या चित्रपटाचे छायाचित्रण सुनिल वानखेडे यांनी केलंय. तर रंगराव घागरे हे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता आहेत.

प्रेमाचा अनुबंध उलगडणारा फ्लिकर

असचं हटके टायटल आणि प्रेमाचा हळूवार अनुबंध उलगडून दाखविणारा 'फ्लिकर' हा आगामी मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नुसरत शानुर मुजावर, मणीगंडन मंजुनाथन, प्रेमराणी मंजुनाथन यांनी निर्मिती आहे. तर सहनिर्मिती राहुल पाटील यांची आहे. अमोल पाडावे यांनी या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन केले आहे. राजवीर सरकार व तन्वी किशोर ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दोघांसोबत सयाजी शिंदे, संजय मोने, समीर चौघुले, शुभांगी लाटकर, पूजा पवार, अरुण कदम, गौरव रोकडे, मनिषा केळकर, मौसमी तोंडवळकर, पूर्णिमा अहिरे, सायली जाधव, प्रतीक्षा शिर्के, किशोर नांदलस्कर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका चित्रपटात आहेत. चित्रपटाची पटकथा-संवाद जय अत्रे, मंदार चोळकर, अमोल पाडावे, समीर सामंत यांनी लिहिले आहेत. मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीतांना शान, बेनी दयाल, मोहम्मद इरफान या हिंदीतील गायकांनी स्वरसाज दिला आहे. या चित्रपटाचे छायांकन उदयसिंग मोहिते तर संकलन आशीष म्हात्रे यांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT