DevManus Madhla Adhyay Kiran Gaikwad in Varanasi for shooting
मुंबई - झी मराठीवर ‘देवमाणूस- मधला अध्याय’ या मालिकेचा प्रोमो प्रसारीत झाला आणि देवमाणूसच्या ह्या सीजनमध्ये काय नवीन पाहायला मिळणार? यात कोण कलाकार असणार? याची सगळीकडे चर्चा सुरू झाली. मुख्य भूमिकेत अभिनेता किरण गायकवाड दिसणार आहे. किरणने आपल्या वाराणसी शूटिंगचा अनुभव सांगितला आणि तिकडच्या इतर गोष्टींनाही उजाळा दिला.
"वाराणसी शूटिंग अनुभव खूप कमाल होता. खरं तर माझ्या बकेट लिस्ट मध्ये होतं की कधीतरी मी वाराणसीला जावं कारण तिकडच्या भाषेचा एक लहेजा आहे. गंगा किनारे आणि तिकडचं सौंदर्य अनुभवायचं होत. जसं मला कळल की वाराणसीला शूटिंग आहे तेव्हा माझा उत्साह अधिक वाढला. जस लास्ट सीजन मध्ये राजस्थानमध्ये शूट केलं तेव्हा मला तिकडची भाषा शिकायला मिळाली आणि राजस्थानी खाद्य पदार्थांचा आस्वाद घ्यायला मिळाला होता.
आम्ही ३-४ दिवसांसाठी वाराणसीला शूट केलं. त्यामुळे टाईमलाइन खूप कट टू कट होती. पण आठवणी अशा आहेत की आम्ही ज्या ठिकाणंवर शूटिंग करत होतो तिकडची माणसं मला ओळखत होती कारण या आधीचे सीजन हिंदी मध्ये डब झालेत. त्यामुळे देवमाणूसचा प्रेक्षक तिथे ही होता. वाराणसी मध्ये देवमाणसाचे प्रकरण येऊन पोहचले आहे हे पाहून आम्हाला खूप आनंद झाला.
वाराणसीच्या गल्लीमध्ये मी चढावर ८-९ किलोमीटर सलग सायकल चालवली आहे. खूप भयंकर हाल झाले होते माझे. सायकल जोरात चालवायची होती आणि त्यात सायकलची चेन ही निघत होती. २-३ वेळा मी पडतापडता राहिलो. तिकडे गर्दीही होती. हे सर्व एके ठिकाणी होतं असताना भान ठेवणं कि आपण एक पात्र साकारत आहोत ती एक वेगळी कसरत होती. मी पहिल्यांदाच वाराणसीला गेलो होतो. माझ्यासाठी सर्वच नवीन होतं. तिकडे मणिकर्णिका घाट आहे, राजाहरिश्चंद्र घाट आहे. सर्वाना एकत्र गंगा आरती मध्ये तल्लीन होताना मला बघायच होत. हा सर्व अनुभव तुम्हाला देवमाणसा मध्ये त्याच्या काही छटा दिसतील.
मी हे सर्व अनुभवायला २ दिवस आधीच पोहचलो होतो कारण मला त्या जागेचा तिकडच्या भाषेचा आणि लोकांच्या वावरण्याचा अभ्यास करायचा होता. माझ्या अभ्यासा दरम्यान मी गंगाघाट पूर्ण फिरलो. मला जितकी माहिती सांगितली गेली त्या प्रमाणे चौऱ्यांशी घाट आहेत, त्यातले ८० घाट तर मी नक्कीच फिरलो. तिथली एक स्पेशल पेहलवान लस्सी आणि कचोरी आहे ती मला आवडली. नाव घेतलं तरी ती चव माझ्या जिभेवर रेंगाळत आहे. आमचं एका लूम मध्ये शूटिंग होतं जिथे साड्या तयार होतात, साडी बनायची प्रक्रिया बघणं खूप मनोरंजक होतं. मी माझ्या आई आणि बायकोसाठी लूममधून काही साड्याही खरेदी केल्या."
देवमाणूस - मधला अध्याय २ जूनपासून रोज रात्री १० वा. फक्त झी मराठीवर पाहता येणार आहे.